दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली, तरी नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, गणेशवाडी, आदी गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले. पाण्याची पातळी अचानक वाढल्याने शेकडो पूरग्रस्त रस्त्यावर पाणी आल्याने गावात अडकले आहेत.
मुसळधार पावसाबरोबर कोयना, राधानगरी, वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना महापूर आला आहे. आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील नृसिंहवाडी, औरवाड, बुबनाळ, आलास, गणेशवाडी, गौरवाड, शेडशाळ, कवठेगुलंद आदी गावात पुराचे पाणी शिरले आहे. शिरोळ आणि कुरूंदवाड पुलावर पाणी आल्याने नृसिंहवाडीचा संपर्क तुटला आहे. तर बुबनाळ, आलास, गणेशवाडी परिसरातही पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. एकंदरीत रस्त्यावर पाणी आल्याने गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुराचे पाणी गावात शिरल्यानंतर दुकान, घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवून जनावरांसह हजारो नागरिक स्थालांतरित झाले आहेत. दोन दिवस पावसाने उघडीप दिली असल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
२०१९ ची पाणी पातळी होण्यासाठी दोन फूट कमी
२०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये मोठे नुकसान झाले होते. कोरोनाच्या संकटात पुन्हा २०२१ मध्ये महापूर आल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. २०१९ ची पाणीपातळी होण्यासाठी दोन फूट पाणी कमी आहे.
फोटो : बुबनाळ गामपंचायतीमध्ये आलेले पुराचे पाणी (छाया - शीतल घोरपडे, बुबनाळ )