कोल्हापूर : शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील मॅट निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बाकी काहीही कारणे न सांगता यासाठी जबाबदार असणाऱ्या शिक्षण आणि वित्त विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे.
सदस्यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेतली व या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, शिंगणापूर येथे खेळांडूकरिता ३२ लाखांची मॅट घेण्यात आली. मात्र, ती निकृष्ट असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार वित्त आणि शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, मॅटचा पुरवठा आदेश देताना चुकीचे स्पेसिफिकेशन देण्यात आली, कबड्डी व कुस्तीचे दोन्ही मॅट अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून फक्त कुस्तीच्या मॅटबाबत चर्चा होत आहे, संबंधित पुरवठादार लघु उद्योजक असताना त्याला मोठ्या रक्कमेची ऑर्डर कशी देण्यात आली, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
विजय बोरगे, विजय भोजे, प्रसाद खोबरे, अमर पाटील, सरदार मिसाळ, राहुल देसाई, सुभाष सातपुते, वीरकुमार शेंडुरे यांनी चव्हाण यांच्याकडे निवेदन दिले. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया आणि तपास सुरू आहे. चौकशी अहवालाप्रमाणे आधी चांगली मॅट बदलून तिचा वापर करणे महत्त्वाचे आहे, असे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.