तानाजी घोरपडे -- हुपरी --खंडणी, लाचखोरी, हप्ते वसुलीबरोबरच अन्य विविध कारनाम्यांच्या मालिकेमुळे सातत्याने वादग्रस्त राहून चर्चेचा विषय ठरलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) पोलिस ठाण्याचा कारभार यापुढे निश्चितपणे सुधारला जाईल, असे आशादायक स्वप्न विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी रौप्यनगरीवासीयांना दाखविले आहे. त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्याची जबाबदारी नूतन सहायक पोलिस निरीक्षक ए. आय. सय्यद यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. ही जबाबदारी ते कितपत, कशाप्रकारे व कशी पार पाडतात याबाबत अनेक शंका व प्रश्न उपस्थित होत आहेत.चांदी व्यवसाय, वाढलेले औद्योगिकीकरणमुळे परिसरातील लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढच होत राहिली आहे. परिणामी अवैध व्यवसाय व गुन्हेगारीनेही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मटका, गुटखा, हातभट्टी, जुगार अड्डे, वडाप वाहतूक, आदी अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढून समाजाला आपले उपद्व्याप दाखविण्याची जराशीही कसर सोडलेली नाही. तसेच चोरी, दरोडे, हाणामारी या गोष्टी तर नित्याच्याच होऊन गेल्या आहेत. हे सर्व प्रकार घडले जातात ते पोलिसांच्या कचखाऊ व निष्क्रिय भूमिकेमुळेच. पोलिसांची अशी भूमिका का निर्माण होते? त्याचे खरे कारण आहे हप्ता वसुलीतून होणारी वरकमाई. अवैध धंदेवाल्याकडून प्रत्येक महिन्याकाठी मिळणाऱ्या हप्त्याच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या पोलिसांकडून कारवाईचे धाडसच राहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मटका व्यवसायात कार्यरत असणाऱ्या व रौप्यनगरीची डोकेदुखी ठरलेल्या तरीही पोलिस मित्र, त्यांचा मार्गदर्शक व तारणहार समजल्या जाणाऱ्या तसेच अनेक वेळा तडीपार ठरविण्यात आलेल्या एका मटकाकिंगकडूनच पोलिस ठाण्याचा कारभार हाकला जात होता. खंडणी, लाचखोरी, हप्ता वसुली व वरकमाईला सोकावलेल्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. अशी या हुपरी पोलिस ठाण्याची सत्य वस्तुस्थिती आहे. या पोलिस ठाण्याला सुधारण्याची जबाबदारी नांगरे-पाटील यांनी आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असणारे सहायक पोलिस निरीक्षक ए. आय. सय्यद यांच्यावर सोपविली आहे. अवैध व्यवसाय : रोखण्याचे आव्हानसय्यद यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिक व गुंडांची इत्यंभुत माहिती निश्चितपणे असणार आहे. मात्र, त्यांना असणारे अधिकार, कर्तव्य बजाविण्याची त्यांच्यातील धमक, पोलिस ठाण्यातील लाचखोरी, हप्ता वसुली थांबविण्याबाबतची त्यांची मानसिकता यावरच विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी रौप्यनगरीवासीयांना दाखविलेल्या स्वप्नांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलेला आहे. तरीही कार्यक्षेत्रातील अवैध व्यवसाय अगदी पूर्वीसारखेच बिनधास्त सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे येत्या आठ दहा दिवसांत पोलिस ठाण्यातील चित्र बदलेल हे स्वप्नं म्हणजे म्रुगजळच ठरण्याची शक्यता आहे.
हुपरी पोलिसांचा कारभार सुधारणार?
By admin | Published: November 16, 2016 11:57 PM