जयसिंगपूर : दुसऱ्या पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून हॉटेल व्यावसायिक पतीने चक्क पत्नीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून स्वत:ही गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर येथे घडली. कृष्णा लक्ष्मण धंगेकर (वय ३८) असे मृताचे नाव आहे. तर जखमी पत्नी कोमल धंगेकर हिच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.
दरम्यान, कृष्णाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून दोन मेव्हणी, साडू व पत्नीच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपाली हरकल, राजेंद्र हरकल, विजय येवले (रा. जयसिंगपूर) व सरला गोंडसे (नाशिक) अशी संशयित आरोपींची नावे असून, विजय येवले (वय २९) व राजेंद्र हरकल (वय ४२) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी विजय धंगेकर यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत माहिती अशी, दत्त हाउसिंग सोसायटी जयसिंगपूर येथील संजय वैद्य यांच्या घरी धंगेकर कुटुंब राहण्यास आहे. मंगळवारी मध्यरात्री कृष्णा याने धारदार हत्याराने कोमलवर वार केल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. मृत कृष्णा हा हॉटेल व्यावसायिक होता. दहा वर्षांपूर्वी त्याने कोमल हिच्याशी दुसरे लग्न केले होते. त्यांना सात वर्षांची मुलगी आहे. तर पहिली पत्नी चिपरी येथे वास्तव्यास आहे.
चिठ्ठीतील मजकूर
सुसाईड नोटमध्ये कृष्णा याची मेहुणी दीपालीने वारंवार मानसिक त्रास दिला आहे. शिवाय माझ्या बायकोच्या नावावर पैसे काढून ते भरले नाहीत. आमच्या नवरा-बायकोमध्ये सारखी भांडणे लाऊन पत्नीला वाममार्गाला लावण्याचे काम दीपालीने केले आहे. यातून पत्नी कोमल हिचे विजय धाब्याचे विजय येवले याच्याशी प्रेमसंबंध जुळल्याचे मला समजले आहे. विजय हा मला सोडपत्र घेण्यासाठी धमकावत होता. शिवाय, मेहुणी दीपाली व सरला यादेखील सोडपत्र देण्यास सांगत होत्या. त्यामुळे मेहुणी दीपाली, सरला, साडू राजेंद्र व विजय येवले हे माझ्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे सुसाईड नोटमध्ये कृष्णा याने नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.