कोल्हापूर : भडगाव (ता. कागल) येथे दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी पती रामचंद्र दत्तात्रय पोवार (वय ५०) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.
भडगाव येथील रामचंद्र पोवार हा मद्यपी होता. दारूच्या नशेत तो पत्नीला सातत्याने मारहाण करीत होता. १३ जुलै २०१८ रोजी रात्री पतिपत्नीमध्ये वाद झाला. दोघांत नेहमीच वादाचे प्रकार घडत असल्याने स्थानिक रहिवाशांनी दुर्लक्ष केले. त्याने पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केला. १४ जुलैला तो त्याच्या घरासमोरील पांडुरंग बाळू खतकर यांच्या घरासमोरील कट्ट्यावर पत्नीचा मृतदेह समोर ठेवून बसला होता. त्यावेळी आपण केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे त्याने नागरिकांना सांगितले. पत्नीचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मुरगूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. दराडे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात १४ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितिजन्य पुराव्यानुसार न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षाही ठोठावली. तपासात पोलीस कॉन्स्टेबल एस. आर. पाटील यांचे सहकार्य लाभले.