कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तीनवेळा लांबणीवर पडलेली इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीची (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षा गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध २३८ केंद्रांवर झाली. एकूण ३१४६७ विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत ऑफलाइन पध्दतीने परीक्षा दिली. हा पेपर देऊन बाहेर येताना बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘झाली एकदाची शिष्यवृत्ती परीक्षा’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यंदा कोरोनामुळे फेब्रुवारीमध्ये एकवेळा आणि जुलैमध्ये दोनवेळा शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अखेर राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी तीन यावेळेत परीक्षा झाली. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण ३२७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३१४६७ जणांनी परीक्षा दिली, तर १२८३ जण अनुपस्थित राहिले. कोरोनाच्या प्रादुर्भाव अद्याप कायम असल्याने सॅनिटायझर, मास्कचा वापर आणि बहुतांश केंद्रांवर थर्मल स्कॅनरव्दारे विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. त्यासाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून केंद्रावर बाहेर विद्यार्थी, पालकांची गर्दी झाली. सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत मराठी, गणित विषयाचा पहिला पेपर, तर दुपारी दीड ते तीन दरम्यान इंग्रजी, बुध्दिमत्ता विषयाचा दुसरा पेपर झाला. विद्यापीठ हायस्कूल, प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल, प्रायव्हेट, महाराष्ट्र हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, आदी परीक्षा केंद्रे विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित झाले. त्यामुळे सहावीतील विद्यार्थ्यांनी पाचवी, तर नववीतील विद्यार्थ्यांनी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. दरम्यान, मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, कन्नड या माध्यमातून ए,बी,सी,डी या संच कोडमध्ये प्रश्नपत्रिका परीक्षेसाठी होती. ‘एमपीएससी’च्या धर्तींवर विद्यार्थ्यांना कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देण्यात आली. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांची एकूण १३ भरारी पथके कार्यरत होती. जिल्हास्तरावरून संपर्क तालुक्यात केंद्रभेटीचे आयोजन केले होते, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.
चौकट
जयसिंगपूरमध्ये पीपीई किट घालून परीक्षा
जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूल येथील केंद्रामध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह परीक्षार्थीने पीपीई किट घालून परीक्षा दिली.
विद्यार्थी काय म्हणतात?
दोन्ही पेपर चांगले गेले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही परीक्षा कधी होईल याच्या प्रतीक्षेत होतो.
-सुहानी लगीवाले, राजारामपुरी.
पहिला पेपर जरा कठीण, तर दुसरा पेपर सोपा होता. परीक्षा झाल्याने खूप बरे वाटत आहे.
-श्रावणी मुळे, माळी कॉलनी
परीक्षा दिलेले विद्यार्थी
पाचवी : २००२८
आठवी : ११४३९