गडहिंग्लज : गावच्या विकासासाठी दिलेल्या निधीची आठवण जपत अडकूर ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा हृद्य सत्कार केला. १० वर्षापूर्वी केलेल्या मदतीबद्दल अडकूरकरांनी दाखविलेली कृतज्ञता आणि प्रेम पाहून हुसेनजी भारावून गेले.अडकूर (ता. चंदगड) येथील छ. शिवाजी चौक सुशोभिकरण, पीकअप शेड व रस्ता डांबरीकरणासाठी हुसेन यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाच्या कारकीर्दीत १० लाखांचा विकासनिधी दिला होता. त्याबद्दल त्यांचा सरपंच यशोदा कांबळे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील हेही यावेळी उपस्थित होते.हुसेन म्हणाले, कांही मंडळींना कालच्या मदतीची आज जाणीव नसते. अशा काळात अडकूर ग्रामस्थांनी आठवणीने गावी बोलावून घेवून केलेल्या सन्मानामुळे मला खूप आनंद झाला. राज्यातील आघाडी सरकार आणि आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून यापुढेही आपण अडकूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू.यावेळी उपसरपंच अनिल कांबळे, माजी सभापती बबन देसाई, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनिलराज सूर्यवंशी, महावितरणचे संचालक अभिजीत उर्फ बॉबी भोसले, शेतकरी संघटनेचे कृष्णराव रेगडे, गणेश दळवी, अडकूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर भेकणे, कादर कोवाडकर, शमीम शेख आदींसह ग्रा.पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी..!मीरा भार्इंदर महापालिकेचे माजी शिक्षण सभापती व अडकूरचे सुपूत्र सुरेश दळवी यांच्या आग्रहापोटी हुसेन यांनी हा निधी दिला होता. त्यामुळे कोकण दौऱ्यावर जाताना त्यांनी आवर्जून अडकूरला भेट दिली आणि आपल्या निधीतून झालेल्या विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
शेळ्यांच्या गोठ्याला भेटकोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या स्थानिक तरूणांच्या मार्गदर्शनासाठी सुरेश दळवी यांनी अडकूरमध्ये सुरू केलेल्या उस्मानाबादी शेळीपालन गोठा आणि चंदगड तालुका संघाचे संचालक अभय देसाई यांनी महिलांच्या रोजगारासाठी सुरू केलेल्या काजू प्रक्रिया प्रकल्पालाही हुसेन यांनी आवर्जून भेट दिली.