कोल्हापूर : हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी एकूण ८५ जणांनी प्रवास केला. त्यातील सर्वाधिक ३५ प्रवासी हे कोल्हापूर-हैदराबाद मार्गावरील होते. धुक्यामुळे वीस मिनिटे उशिरा विमान कोल्हापूरमध्ये आले.उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अलायन्स एअर कंपनीने हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा रविवार(दि. ९)पासून सुरू केली. या सेवेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी धुक्यामुळे पूर्वनिर्धारीत वेळेपेक्षा वीस मिनिटे उशिरा विमानाने हैदराबादहून उड्डाण केले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास हे विमान कोल्हापूरमध्ये दाखल झाले. दिवसभरात एकूण ८५ जणांनी विमान प्रवास केला. त्यामध्ये हैदराबादहून कोल्हापूरला आठ प्रवासी आले.
कोल्हापूर ते बंगलोर १५ जणांनी, बंगलोर ते कोल्हापूर २७, तर कोल्हापूर ते हैदराबाद मार्गावर ३५ जणांनी प्रवास केला. ही विमानसेवा दैनंदिन स्वरूपाची आहे, अशी माहिती अलायन्स एअर कंपनीचे कोल्हापूरचे व्यवस्थापक विजय घाटगे यांनी सांगितले.