अतुल जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : मोहिते वडगाव (ता. कडेगाव) येथील शेतकरी व ट्रॅक्टर मालक राजेश मोहिते यांनी हायड्रोलिक रेजर तयार केला आहे. या आधुनिक रेजरमुळे शेतात तीन फुटी व त्यापेक्षा अधिक मोठ्या सरी सोडणे सोपे जाणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा ट्रॅक्टरमालकांना होणार आहे. हा नवीन पद्धतीचा रेजर पाहण्यासाठी ट्रॅक्टर मालक व शेतकरी गर्दी करीत आहेत.शेती व शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. पण जमिनीचे लहान तुकडे झाल्यामुळे मेहनत करताना अनेक त्रुटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असतो. शेतामध्ये सरी सोडण्यासाठी लागणारा रेजर यापूर्वीही विकसित झाला आहे, पण त्याद्धारे सोडलेल्या सरी एका रेषेत येत नसल्याने सरीची रुंदी कमी-अधिक होत होती. शेतामध्ये विविध पिके घेताना याचा त्रास शेतकऱ्यांना होत होता. जुन्या पध्दतीच्या रेजरने शेतकऱ्यांना व ट्रॅक्टर मालकांना शेतामध्ये विविध पिके घेताना वेगवेगळया सरी सोडताना मोठी कसरत करावी लागत होती. प्रयोग म्हणून मोहिते यांनी इस्लामपूर येथील एका दुकानदाराच्या मदतीने नवीन रेजर विकसित करण्याचा ध्यास घेतला. सातत्याने एक महिना निरनिराळे प्रयोग केल्यानंतर हायड्रोलिक रेजर तयार झाला. यासाठी त्यांना पन्नास हजार रुपये खर्च आला. या नवीन रेजरमुळे ट्रॅक्टर मालकाचा वेळ, इंधन, पैसे वाचणार आहेत. ग्रामीण भागातील एक सामान्य शेतकरी नवीन यंत्र विकसित करू शकतो, हे मोहिते यांनी दाखवून दिले. त्यांनी तयार केलेला रेजर पाहण्यासाठी कऱ्हाड, इस्लामपूर, कडेगाव येथील शेतकरी भेट देत आहेत.
शेतकऱ्याने बनविला हायड्रोलिक रेजर
By admin | Published: May 09, 2017 11:38 PM