श्रीकांत ऱ्हायकरधामोड- गेल्या सात वर्षापासून तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून रब्बी व उन्हाळी पिकांबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून जवळपास २ टी.एम.सी. पाणी धरणातुन सोडण्यात येते. त्याचबरोबर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही बरेचसे पाणी असेच वाहून जाते.
या पाण्याचा दुहेरी फायदा घेता येईल व याच दोन टी .एम.सी. पाण्यातून १ .५ मेगावॅट विज निर्मीती करता येईल म्हणून मुख्य अभियंता विद्युत मुंबई कार्यालयाकडुन दोन दिवसापूर्वी ' तुळशी जलविद्युत प्रकल्पाची ' निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने १३ वर्षापासून अडथळ्यांची शर्यत झेलत असलेला हा प्रकल्प साकारणार हे निश्चित झाले आहे.
बांधा, वापरा व हस्तातंरीत करा या धोरणानुसार राज्य शासनाने मुख्य अभियंता विद्युत कार्यालयाच्या अधिकाराखाली या प्रकल्पाची निविदा दोनच दिवसापूर्वी ऑनलाईन पध्दतीने प्रसिद्ध केली आहे. ३० वर्षानंतर हा प्रकल्प पुन्हा शासनाच्या ताब्यात दिला जाणार आहे. या नियोजीत प्रकल्पातुन सुमारे ४६ लाख युनिट म्हणजे १.५ मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षातच पूर्ण होणार असून स्थानिकांना रोजगार ही उपलब्ध होणार आहे .या विजनिर्मिती प्रकल्पामुळे भारनियमनाचा भार थोडा का होईना हलका होण्यास मदत होणार आहे.शासनाने २००७ साली ही अशाच पद्धतीने निविदा मागवल्या होत्या. त्यावेळी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था लि.वारणानगर या संस्थेने निविदा भरलेली होती. पण दरम्यानच्या काळात तुळशी धरण क्षेत्रात पाणी संचय कमी होत असल्याचे कारण पुढे करत या प्रकल्पाला 'खो ' घातला होता. मात्र गेल्या पाच वर्षापासून केळोशी बुद्रुक येथील 'लोंढानाला ' प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरीक्त पाणी थेट 'तुळशी ' धरणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे आता हा खडलेला प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे .
या प्रकल्पासाठी तुळशी धरणाशेजारीच मुबलक जागा, पाणी उपलब्ध असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास आता अडथळे येणार नाहीत प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे.- पी.जे. माने, उपविभागीय अभियंता, भोगावती पाटबंधारे उपविभाग, राधानगरी