लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरा होगा!' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेचे ठरले आहे. भाजपची संगत सोडली. आता महाविकास आघाडीतूनही बाहेर पडून ‘एकला चलो रे’चा मार्ग ते निवडतात की काय, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनता काय कौल देते, ते पाहून पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
भाजपला विरोध म्हणून त्यांनी महाविकास आघाडीशी संगत केली; परंतु त्या सरकारकडूनही लोकांच्या प्रश्र्नांना न्याय देण्याची भूमिका दिसत नसल्याचा अनुभव येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला. आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेट्टी यांचे राजकारणही सार्वजनिक चारित्र्य जपणारे आहे. त्यामुळे ज्या आघाडीला आपण पाठिंबा दिला, त्यांच्या कृत्यांची घाण आपल्या अंगावर उडू नये, अशाही भावना संघटनेतून व्यक्त होत आहेत.
शेट्टी म्हणाले, लोकसभेमध्ये झालेला पराभव सर्वांनाच धक्कादायक होता. पराभवानंतर राज्यभर फिरून लोकांच्या भावना समजून घेतल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना सामान्यांचे प्रश्न घेऊन लढणारी संघटना आहे. सामान्यांच्या प्रश्नांचे भांडवल करण्यात विरोधी पक्षाला रस आहे. मात्र मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी रस नाही. सातबारा कोरा केल्याशिवाय अमक्याची अवलाद नाही, अशा गप्पा ठोकल्या जातात. पेट्रोल, डिझेल, गॅसची महागाई प्रचंड वाढली आहे. याबद्दल महाविकास आघाडीला काही सोयरसुतक नाही. दिल्लीमध्ये शेतकरी कायद्याविरोधात गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचेही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काही देणेघेणे नाही. महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल माफ करण्याचे सूतोवाच केले. मात्र, सध्या वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्याचा फटका दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना बसत आहे. याचे काहीच गांभीर्य महाविकास आघाडी सरकारला नाही.
२२ जवान मारले त्याबद्दल बोला...
राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. शेतकऱ्यांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न कुठे दिसत नाहीत. भाजपला कंगना राणावत, सुशांत राजपूत, अर्णब गोस्वामी या विषयांत रस आहे. अंबानी यांच्या घरासमोरील जिलेटिन कांड्यांचा स्फोट होणार नाही, हे माहीत असूनही चर्चा सुरू आहे. नक्षलवाद्यांनी २२ जवान मारले त्याबद्दल बोलायला कोणीही तयार नाही, अशी नाराजी शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.