भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा केलेले गुरुजी चौकशीत ‘तो मी नव्हेच’, आम्ही मिटवायला गेलो होतो, असा पवित्रा घेत शिक्षण विभागाच्या चौकशी समितीची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. चप्पल, खुर्च्यांची फेकाफेकी करतानाची छायाचित्रे, व्हिडिओ चित्रीकरण दाखविले तरी खोटी उत्तरे देऊन ‘राडेबाज गुरुजीं’नी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. चौकशीत सबळ पुरावे मिळू नये, म्हणून सध्या बँकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘मिलीभगत’झाल्याचे समोर येत आहे. शिक्षक बँकेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २३ आॅगस्टला आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केली होती. या सभेत सत्तारूढ व विरोधकांच्यातील राड्यात कपडे फाटेपर्यंत शिक्षकांना मारहाण करण्यात आली. अर्वाच्च्य शिवीगाळ, खुर्ची, चप्पल यांची फेकाफेकी झाली. या घटनेचे विविध प्रसारमाध्यमांनी चित्रीकरण केले, छायाचित्रे काढली. चित्रीकरणातील व्हिडिओमध्ये आणि छायाचित्रांमध्ये चप्पलने मारहाण करणारे, खुर्च्यांची फेकाफेकी करणारे, कपडे फाडणारे, एकमेकांवर धावून जाणारे, तुटून पडणारे या सर्व गुरुजींचे चेहरे स्पष्टपणे दिसतात. त्यातील काही छायाचित्रे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत ठळक प्रसिद्धही झाले आहेत. चित्रीकरण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गुरुजींचा ‘प्रताप’ पोहोचला. शिक्षणक्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. परिणामी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सूचनेवरून प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली. गेल्या आठ दिवसांपासून चौकशी सुरू आहे. पहिल्यांदा चौकशी समिती बँकेत गेली. इतिवृत्ताची प्रत मागितली. त्यावेळी बँकेच्या प्रशासनाने अध्यक्षांना विचारायला हवे, असे सांगून उडवून लावले. समितीने बँकेला शासकीय कारवाईचा ‘धाक’ गोड शब्दांत सांगितला.सर्व चित्रीकरण, छायाचित्रे मिळविली. राडा करणाऱ्या गुरुजींचे चेहरे शोधले. अशाप्रकारे सापडलेले ३८ राडा करणाऱ्या गुरुजींची चौकशी केली. चौकशीवेळी संबंधित गुरुजींना सभेतील ‘अवतार’ छायाचित्रे आणि चित्रीकरणातून दाखविला. चौकशीतील सर्वच गुरुजींनी ‘तो मी नव्हेच, मी तर मिटवायला गेलो होतो,’ असा उलट पवित्रा घेत समितीची धूळफेक करण्याचा प्रयत्न केला.मिलीभगत...राड्यानंतर वृत्तपत्रांना प्रतिक्रिया देऊन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना दोषी ठरविले. गुंड आणून सभा उधळली, जहरी टीका केली. मात्र, चौकशीवेळी राडा केलेल्या कोणत्याही गुरुजींवर कारवाई होऊ नये म्हणून एकमेकांना सांभाळून घेत असल्याचे समोर येत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मिलीभगत आहे का, असा प्रश्न सभासदांतून उपस्थित होत आहे. चौकशी पूर्ण झाली आहे. एकूण ३८ जणांची चौकशी करून जबाब नोंदविले आहेत. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयारीचे काम सुरू आहे.
‘तो मी नव्हेच’, राडेबाज ३८ गुरुजींचा पवित्रा
By admin | Published: September 08, 2015 12:26 AM