“मी शरद पवार यांना लपून भेटलो नाही”; गुप्त भेटीबाबत विचारल्यावर अजित पवार संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 06:00 AM2023-08-16T06:00:40+5:302023-08-16T06:02:34+5:30
पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुणे येथे उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी बंद दाराआड चर्चा झाली. या गुप्त भेटीबाबत अजित पवार यांना विचारले असता ते चांगलेच संतापलेत. मी शरद पवार यांना काही लपून भेटलेलो नाही, असे म्हणाले. पुण्याच्या बैठकीचे कोणी मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
अजित पवार मंगळावरी कोल्हापुरात होते. शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर, मराठा आरक्षण संबंधी बैठक झाली. त्यानंतर त्यांनी शरद पवार भेटीबाबत माहिती दिली. दरम्यान, जयंत पाटील हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: त्या दिवशी काय झाले याची माहितीच दिली. चोरडीया यांचे वडील शरद पवार यांचे क्लासमेंट होते. त्या दिवशी ते व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. मी चांदणी चौकातील कार्यक्रम संपवून येणार होतो. त्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही होते. चोरडीया यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होते, असंही अजित पवार म्हणाले.
मराठा आरक्षण बैठकीत गोंधळ
- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
- आधी बैठकीत प्रवेश नाकारल्यामुळे तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का घेतली, असा सवाल केला.
- यावेळी गोंधळ झाल्याने बैठकीला गालबोट लागले. यावेळी कोल्हापूर कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
- सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसांनी दारावर रोखले.