कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या एका ग्रामस्थाकडे विचारणा केली की ‘तुम्ही लस का घेतली नाही’. ‘दारू प्यायल्यानंतर तीन दिवस लस घ्यायची नाही’ असे मला कळले म्हणून मी लस घेतली नाही. या उत्तराने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ उपस्थितांवर आली.
सर्वाधिक लस न घेतलेले नागरिक हातकणंगले तालुक्यातील असल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हा तालुका आपल्याकडे घेतला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर शिरोळ तालुका आहे. हा तालुका चव्हाण यांनी आपल्याकडे घेतला आहे. चव्हाण यांनी या तालुक्याची आणखी जबाबदारी जलजीवनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांच्यावर दिली आहे.
मोरे यांनी गुरुवारी शिरोळच्या काही गावांना भेट दिली. शुक्रवारी पुन्हा चव्हाण हे देखील शिरोळ तालुक्यातील काही गावांमध्ये गेले. या ठिकाणी ‘आपण लस का घेतली नाही’ अशी विचारणा केल्यानंतर ‘दारू पिल्यानंतर तीन दिवस लस घ्यायची नाही’ असे उत्तर दिल्यानंतर चव्हाण यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना हसावे का रडावे हेच कळेना. अहो, तुम्ही दारू पिऊ नका, मात्र लस तेवढी घ्या असे सांगून सर्वजण बाहेर पडले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत अधिकाधिक लसीकरण करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. लसीचे दोन डोस हेच कोरोनापासून संरक्षण देणार असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही अतिशय गांर्भीर्याने ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
लसीकरणाबाबत चुकीचा प्रचार
काही व्यक्ती लसीकरणाबाबत चुकीचा प्रचार करत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याच तालुक्यात ज्याने लसीचे दोन डोस घेतले आहेत, असा धार्मिक संघटनेचा एक नेता लस घेणे कसे चुकीचे आहे हे सांगून अधिकाऱ्यांना जाब विचारत असल्याच्या तक्रारी आहेत. लस घेतलीच पाहिजे, असे सर्वाेच्च न्यायालयाने कुठे म्हटले आहे, अशी विचारणाही तो करत आहे.