इचलकरंजी : खर्डा-भाकरी मी रोजच खातो. शेतकऱ्यांनी विष दिले तरी खाण्यास मी तयार आहे, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना सांगितले. संघटनेच्या कार्यकर्त्यांना लाडू चारण्याचा प्रयत्न आवाडे यांनी केला, मात्र, त्यांनी तो खाल्ला नाही.साखर कारखान्याच्या अध्यक्षांना खर्डा-भाकरी देण्याच्या कार्यक्रमांतर्गत स्वाभिमानीचे नेते आवाडे यांच्या निवासस्थानासमोर आल्यानंतर आवाडे यांनी त्यांना घरात बोलावून घेतले. त्यांनी दिलेली खर्डा-भाकरी आवाडे आणि राहुल आवाडे यांनी खाल्ली. तसेच आंदोलनकर्त्याला लाडू चारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळी दर मिळाल्याशिवाय साजरी होणार नाही, असे म्हणत आंदोलनकर्त्याने लाडू खाल्ला नाही. त्यांचा मान राखून हातात घेतला. याचवेळी जवाहरचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे शेजारी बसले होते.शुक्रवारी सकाळी शंभूशेटे, बसगोंडा बिरादार, पुरंदर पाटील, बटू पाटील, कुमार जगोजे, सतीश मगदूम, विश्वास बालिघाटे, अण्णासाहेब शहापुरे, रमेश पाटील, रावसाहेब लट्टे, सदाशिव मिरजे-पाटील, आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हातात भाकरी घेऊन आवाडे यांच्या निवासस्थानासमोर आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच आवाडे समर्थक व कारखान्याचे संचालकही उपस्थित होते.माझ्याकडे लाल-हिरवा खर्डामी शेतकरी असल्याने रोजच कण्या आणि ताक माझ्या नाष्ट्यामध्ये असतात. मी रोजच खर्डा-भाकरी खातो. तुम्ही एका रंगाचा खर्डा आणला आहे. माझ्याकडे लाल आणि हिरवा दोन्ही रंगांचा खर्डा असल्याचे आमदार आवाडे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले, त्यानंतर हश्या पिकला.
साखर कारखानदारांना खर्डा-भाकरीगेल्या वर्षाच्या उसाला प्रतिटन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने देऊन ऊस उत्पादकांची दिवाळी गोड करावी, या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना खर्डा भाकरी देऊन लक्ष वेधण्यात आले. अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील, शिरोलीतील निवासस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह सर्वच कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालकांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी दिली.