सातारा: ‘मी कॉलर उडवतो, यापुढेही उडवत राहणार. तुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय. माझ्यासारखा कोणी वाईट नाही. माझ्या कॉलरवर बोलायचे असेल तर समोर येऊन बोला,’ असा सज्जड इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता दिला.
खासदार उदयनराजे म्हणाले, ‘मैने एक बार कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नही सूनता,’ असाही टोला लगावला. ‘सातारा राजधानी महोत्सव या कार्यक्रमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मुलांना वाव मिळाला पाहिजे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे. याला कोणी राजकीय स्वरूप देऊ नये. अजूनही असा कोणीही प्रयत्न केला नाही. मुलाच्या भवितव्यासाठी काम करत राहणार आहे. मी केलेली नौटंकी दिसते. लावणी म्हणतो, या पुढेही करतच राहणार. मी नेहमीच खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझ्या वागण्यात बदल होणार नाही. मी तत्त्व सोडून बोलत नाही. माझ्या स्वभावात बदल करू शकत नाही.’
दरम्यान, छत्रपती घराण्याचा मानाचा शिवसन्मान पुरस्कार अभिनेते अमिताभ बच्चन यांना तर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे जीवनगौरव पुरस्कार लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि. २७ रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
सातारा गौरव पुरस्कार यांना देण्यात येणार : साहित्यिक व पत्रकारिता- रफिक मुल्ला, कला व सांस्कृतिक- श्वेता शिंदे, क्रीडा- ललिता बाबर, पैलवान नंदकुमार विभूते, शिक्षण- पुरुषोत्तम शेठ, उद्योजकता- अजित मुथा, आदर्श सेवा- गुरुवर्य बबनराव उथळे, छोटे उद्योजकता- राजेंद्र घुले, सामाजिक कार्य- माहेश्वरी ट्रस्ट, विशेष कर्तृत्व- मेजर गौरव जाधव, कृषी-संतोष सूर्यवंशी, आदर्शग्राम- हिवरे (ता. कोरेगाव), पर्यावरण मित्र- विजय निंबाळकर.या पत्रकार परिषदेला पंकज चव्हाण, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, गीतांजली कदम, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजेंना तरी ‘रयत’वर घ्यायला हवे होतेदरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड करताना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी यांच्या निवडी केल्या. मात्र, आमच्या राजघराण्यावरच अन्याय का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उदयनराजेंनी रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवडीवरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. राजघराण्यातील मला नको; पण आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना तरी संस्थेवर घ्यायला हवे होते; पण तसे झाले नाही. ज्यांचे योगदान नाही, अशा लोकांची निवड करून राजघराण्याला डावलले गेले, अशी नाराजी व्यक्त केली.