लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘मघा’ नक्षत्र काळात अनेक वेळा जोरदार पाऊस कोसळतो. मात्र, यंदा ‘मघा’ नक्षत्राने शेतकऱ्यांना ढगाकडे बघायला लावले आहे. जिल्ह्यातील खरिपाची पिके धोक्यात आली असून पाण्याची सोय आहे, मात्र वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी मुरले नाही. त्यामुळे पावसाने दडी मारल्यानंतर जमिनीने ओढ धरण्यास सुरुवात केली. भाताला सतत पाणी लागते. सध्या पाण्याविना भाताची वाढ खुंटली असून त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. पाण्याविना जमिनीला भेगा पडू लागल्याने माळरान, डोंगरमाथ्यावरील भुईमूग, नागली, ज्वारीच्या पिकांनी मान टाकण्यास सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला असला तरी हा पाऊस सर्वदूर नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. ऊसालाही पाण्याची गरज आहे. विहीर, नदीत पाणी आहे. मात्र, विद्युत पंपांना वीज नाही. अनेक गावात शेतकरी वीज वितरण कार्यालयात हेलपाटे मारून वैतागले आहेत.
शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण होते, त्यामुळे पाऊस सुरुवात करेल, असे वाटत होते. मात्र दिवसभर कडकडीत ऊन राहिले. कमाल तापमानही २८ डिग्रीपर्यंत पोहचले होते. तापमान वाढल्याने पिके आणखी धोक्यात आली आहेत.
आज पावसाची शक्यता
आज, रविवारी पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवला आहे.
‘सुना’ जोरदार बरसणार
‘मघा’ नक्षत्र कोरडे गेल्याने आता ‘पुर्वा फाल्गुनी’ नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. सुर्य सोमवारी ‘पुर्वा फाल्गुनी’ नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्रकाळात पडणाऱ्या पावसाला ‘सुनांचा पाऊस’ म्हणतात. वाहन ‘बेडूक’ असल्याने जोरदार बरसेल, काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण होईल, असा अंदाज आहे.