लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दिवस-रात्र रस्त्यावर राहायचं, कोरोनासाठी ‘फ्रंट लाईन वॉरियर्स’ म्हणून जीव धोक्यात घालून काम करायचं, त्याचा स्वतंत्र भत्ताही दिला जात नाही... अशावेळी आमच्याच पगारातून एक-दोन दिवसांचा पगार कापून घ्यायचा हे योग्य नाही, त्यामुळे आमचा पगार कपात करू नये, अशा नाराजीच्या प्रतिक्रिया जिल्ह्यातील पोलीस खात्यातून उमटत आहेत. त्यासाठी पगार कापून करून घेऊ नयेत असे लेखी अर्ज पोलिसांकडून प्रत्येक पोलीस ठाण्यातून केले जात आहेत.
कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणगी म्हणून एक-दोन दिवसांचे वेतन उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाने सहा दिवसांपूर्वी काढले. परिपत्रकावरुन पोलिसांतून मात्र नाराजींचा सूर उमटत आहेत.
कोरोना कालावधीत पोलीस व आरोग्य कर्मचारी यांना ‘फ्रंट लाईन वॉरियर्स’ म्हणत पूर्णवेळ काम करण्याचे शासनाने आदेश दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नियमापेक्षा जादा काम करण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यावर आली आहे. पोलीस जादा वेळ काम करतात म्हणून त्यांना विशेष भत्ताही दिला जात नाही, उलट पगारातून कपात करणे ही बाब कर्मचाऱ्यांसह आता वरिष्ठांनाही खटकत आहे. त्यातून पोलीस कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
कोरोना महामारीच्या आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत पुनवर्सन कामास हातभार लावावा यासाठी राज्यातील सर्व भाप्रसे, भापोसे व राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय ‘गट अ’ व ‘गट ब’चे राजपत्रित अधिकाऱ्यांनी मे २०२१ च्या वेतनातील प्रत्येकी दोन दिवसांचे तसेच ‘गट ब’ राजपत्रित, ‘गट क’ व ‘ड’च्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचे आवाहन राज्य शासनाकडून केले आहे. त्यावरून पोलीस विभागात नाराजीचा सूर उमटत आहे.
१५ टक्के ड्यूटीवर राहून पूर्ण पगार घेणाऱ्यांचा पगार कपात करावा
आपत्ती निवारण योजनेसाठी निधी जमा करायचे असेल तर इतर विभागांतील जे कर्मचारी १५ टक्के घरी व १५ टक्के ड्यूटीवर आहेत, पण पूर्ण पगार निघतो, अशांच्या पगारातून कपात करून घ्यावा, अशा प्रतिक्रिया पोलिसांतून उमटत आहेत.
पोलीस मुख्यालयातूनच मोठा विरोध
पगारातून निधी कपातीला प्रथम कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्याकडूनच विरोध मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या स्थितीत मुख्यालयातील नऊ विभागांतील १४७ पोलिसांनी पगार कपातीस लेखी विरोध दर्शविला. प्रत्येक पोलीस ठाण्यातूनही ‘आमचा पगार कापू नये’ असे अर्ज पुढे येत आहेत.
सेवानिवृत्तांच्या वेतनालाही कात्री
सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही. उलट सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महागाई भत्ता गेली अनेक वर्षे दिलेला नाही तरीही आपत्ती व्यवस्थापन निधीची कात्री सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही लागणार आहे.