कोल्हापूर : कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत चेष्टेवारी स्वत:सह मुलीला विष घ्यायला सांगून बेशुद्ध पडलेल्या वडिलांचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सखाराम शंकर पाटील (वय ४५, रा. पिसात्री, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. त्यांची मुलगी सरिता (१९) हिची प्रकृत्ती अत्यवस्थ असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.अधिक माहिती अशी, सखाराम पाटील हे शेती करीत होते. ते पत्नी, मुलगा, मुलगी असे राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. दररोज दारू पिऊन घरातील लोकांना ते शिव्या देत होते. सरिताचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. नुकताच तिचा साखरपुडा झाला आहे.
वडिलांना ती दारू पिण्यास विरोध करीत असे. यातून त्यांच्यात वादावादी होत होती. शुक्रवारी (दि. ५ आॅक्टोबर) ते दारू पिऊन घरी आले. यावेळी मुलगी सरिता हिने तुम्ही पुन्हा दारू पिऊन का आलात, आम्हाला सुखाने जगू द्या, असे म्हटल्यावर त्यांनी तिच्याशी वाद घातला. घरातील विषारी औषध आणून तिला चेष्टेवारी तू औषध पिऊन मर, असे म्हणाले.
संतापलेल्या सारिकाने औषध प्राशन केले. तिला उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने वडील सखाराम भांबावून गेले. त्यांनीही विष प्राशन केले. दोघेही घरामध्ये बेशुद्ध पडले.
नातेवाइकांनी दोघांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सोमवारी उपचार सुरू असताना सखाराम पाटील यांचा मृत्यू झाला, तर मुलगी सरितावर उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेने पिसात्री गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.