कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बुधवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लवकर सकारात्मक कार्यवाही शासनाकडून व्हावी, अन्यथा बारावीच्या लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा संघाच्यावतीने सचिव प्रा. अविनाश तळेकर यांनी यावेळी दिला.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार विभागीय संघाने आंदोलनाच्या तिसऱ्या टप्पा म्हणून मूक मोर्चा काढला. टाऊन हॉलपासून दुपारी तीन वाजता मोर्चा सुरू झाला. तोंडाला काळ्या फिती बांधून, प्रलंबित मागण्या आणि विभागीय संघाच्या नावाचे फलक घेऊन मोर्चामध्ये शिक्षक सहभागी झाले.
दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी चौक, महानगरपालिका चौक मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हा मोर्चा आला. याठिकाणी झालेल्या निषेध सभेत प्रा. तळेकर यांनी मार्गदर्शन केले. शासनाशी वेळोवेळी चर्चा होवून झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांच्या मान्यता, त्यांच्या शालार्थ मान्यतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन शासनाने लादलेले आहे. महासंघाकडून आंदोलनाचे तीन टप्पे पूर्ण झाले, तरी शासन अजून जागे झालेले नाही. येत्या दोन दिवसांत महासंघाची बैठक होवून आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर होईल, असे प्रा. तळेकर यांनी सांगितले.
यानंतर शिक्षण निरीक्षक डी. एस. पवार यांना आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात संघाचे विभागीय अध्यक्ष पी. एन. औताडे, उपाध्यक्ष एन. डी. बिरनाळे, एन. बी. चव्हाण, के. जी. जाधव, बी. बी. पाटील, ए. बी. उरूणकर,ए. डी. चौगुले, शिवाजीराव होडगे, टी. के. सरगर, विजय मेटकरी, अजित डवरी, कांचन पाटील, नेत्रा पवार, आर. एस. किरूळकर, अशोक पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले.