देशासाठी माझा पती शहीद होऊनही त्यांच्या नावे दिलेला प्लॉट मिळण्यासाठी १४ वर्षे संघर्ष करावा लागत असेल तर याला कंटाळून मी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा थेट इशारा वीरपत्नी वृषाली महादेव तोरस्कर यांनी दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
गडहिंग्लज येथील वृषाली तोरस्कर यांचे पती महादेव तोरस्कर हे २००१ साली झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले होते. यानंतर शासनानं त्यांना गडहिंग्लज येथील विजयनगर येथे २००७ साली दोन गुंठे जागा जाहीर केली होती. त्याजागेवर वृषाली यांनी २००८ साली बांधकाम सुरू केलं होतं. पण निम्म बांधकाम झाल्यावर त्यांना काही जणांनी विरोध केला. वृषाली तोरस्कर याविरोधात न्यायालयात गेल्या आणि न्यायालयानंही त्यांच्या बाजूनं निर्णय दिला आहे, असं त्या सांगतात.
न्यायालयाच्या निर्णयानंतरही मला दिलेल्या जागेवर बांधकाम करण्यास स्थानिक विरोध करत असल्याचं वृषाली यांचं म्हणणं आहे. "मला ज्या ठिकाणी जागा देण्यात आली. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या वीरपत्नीलाही जागा देण्यात आली. त्याचे बांधकामही पूर्ण झाले आहे. पण फक्त मलाच विरोध केला जात आहे", असा आरोपही वृषाली यांनी केला आहे. या प्रकरणात शासनानं लक्ष घातलं नाही तर प्रजासत्ताक दिनीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं वृषाली यांनी जाहीर केलं आहे.