कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील विमान सेवांचा विस्तार करण्यासाठी छोट्या शहरांच्या विमानसेवा वाढविण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिले.‘महाराष्ट्र चेंबर’च्या हवाई वाहतूक समितीने केंद्रीय मंत्री पुरी आणि विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन सिंग यांच्याशी स्वतंत्र बैठका घेऊन महाराष्ट्रातील विमान सेवांच्या प्रश्नासंबंधी चर्चा केली. विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयात चेअरमन सिंग यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा, धावपट्टी विस्तारीकरणाचे कार्य लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले असल्याने कोल्हापूरबद्दल मला विशेष आत्मीयता असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळासंबंधी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६४ एकर जमीन संपादित करण्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना कळविले जाईल, असेही सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील ए. व्ही. कोळी, बिपिन कुमार, जे. के. जैन, प्राधिकरणाचे अधिकारी ए. के. पाठक सहभागी झाले.
दरम्यान, यापूर्वी मंत्री पुरी यांच्या कार्यालयातील बैठकीत ‘महाराष्ट्र चेंबर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष गांधी यांनी राज्यातील विमानतळांचे प्रश्न मांडले. शिर्डी, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याची आवश्यकता विषद केली. कोल्हापूर -मुंबई विमानसेवेसाठी सकाळी आणि संध्याकाळची वेळ मिळावी.
कोल्हापूर- दिल्ली-अहमदाबाद या नवीन सेवांचा प्रारंभ करावा, अशी मागणी केली. नियोजन विभागाचे सदस्य ए. के. पाठक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. मंत्री पुरी यांनी सर्व विषयांवर चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या.
हवाई वाहतूक समितीचा अहवाल सादरदेशभरातील विमानतळावरील सुविधांमधील सुधारणा, विमान कंपन्यांबाबतच्या तक्रारी, सवलतींची अपेक्षा आदींबाबतचा ‘महाराष्ट्र चेंबर’च्या हवाई वाहतूक समितीने तयार केलेला अहवाल गांधी यांनी यावेळी सिंग यांना सादर केला.