सदाशिव मोरेआजरा : एकवेळ घरात थांबेन पण भाजपात प्रवेश करणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी निधी दिला. त्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. ते वाटंगी (ता. आजरा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते.मेळाव्यात तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल देसाई तर गडहिंग्लज बाजार समितीच्या सभापतीपदी अभय देसाई यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. विधानसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी राजेश पाटील यांना मिळवून देण्यापासून त्यांना निवडून आणण्यापर्यंत त्यांच्यासोबत आहे. या पुढील काळातही आम्ही त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे यावेळी शिवाजी नांदवडेकर, अल्बर्ट डिसोझा - वाटंगी, सुरेश बुगडे - कोळींद्रे, आप्पासाहेब देसाई - निगुडगे, सुभाष देसाई - शिरसंगी, अनिल फडके - सुळे, एम. के. देसाई - सरोळी, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई - वेळवटी यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. मला मंत्रिपद नको पण मतदारसंघातील विकासासाठी निधी व राष्ट्रवादी पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी संधी द्या अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यांनी त्याला मान्यताही दिली आहे असेही आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. मेळाव्याला जनार्दन बामणे, भीमराव वांद्रे, धनाजी दळवी, तानाजी राजाराम, एम. एस.पाटील, सुभाष देसाई, मधुकर यलगार यासह वाटंगी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी नांदवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
एकवेळ घरात थांबेन पण भाजपात प्रवेश नाही - आमदार राजेश पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 2:03 PM