कोल्हापूर : तू कुठे राहतो..कुणाकडे राहणार..तुला जेवायला कोण देतं.. या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या चौकशीला प्रतिसाद देत ..दीदी मला कपडे देते..जेवण देते..मी पकादादाकडे राहणार असल्याचे निरागस उत्तर प्रशांत पाटील या मतिमंद मुलाने शुक्रवारी दिले. त्याचा चुलतभाऊ प्रकाश बापूसो पाटील यांना प्रशांतच्या पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली.. मनोरूग्ण या प्रवर्गासाठी पालकत्वाची तरतूद नसल्याने त्यांचे पालकत्व हे न्यायालयामार्फत घेण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
१८ वर्षावरील मतिमंद, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्नता मुलांच्या पालकत्वासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ ची अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. करवीर तालुक्यातील वाकरे येथील प्रशांत शिवाजीराव पाटील याच्या पालकत्व प्रमाणपत्रानुसार आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली.
यावेळी प्रकाश पाटील, कृष्णात पाटील आणि चंद्रकांत पाटील या तिघांचे म्हणणे तसेच प्रत्यक्ष प्रशांत पाटील याचे म्हणणे ऐकण्यात आले. विचारलेल्या सर्व प्रश्नांना तितक्याच सहजतेने उत्तरे देत त्याने आपण सायकल आणि स्कूटी चालवत असल्याचेही सांगितले. शिवाय उपस्थिती नोंदणी वहीवर सहीदेखील केली.जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी विषयवाचन केले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या निरीक्षणाची माहिती वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांनी मांडली. यानंतर प्रशांतचे पालकत्व प्रकाश पाटील यांना देण्यात आले.
यावेळी स्वप्निल विकास कदम याचे पालकत्व काका सुरेश झांबरे, मुनवार नरूला सय्यद याचे पालकत्व भाऊ अर्शद सय्यद, साहील मनसुर गोलंदाज याचे पालकत्व आई शहनाज गोलंदाज आणि उज्वला नारायण निर्मळे हिचे पालकत्व भाऊ संतोष यांच्याकडे देण्यास मंजुरी देण्यात आली.