कागल : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते तेव्हा पाच वेळा निवडून आलेल्या हसन मुश्रीफ यांचा पालकमंत्रिपदावर हक्क होता. परंतु, त्यांना पालकमंत्रिपद मिळू नये म्हणून कोणी काय केले, याचा मी साक्षीदार आहे. म्हणूनच आता कागलकरांना वचपा काढायची संधी आली आहे. तो वचपा आता काढा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. कागल येथील सभेत सोमवारी ते बोलत होते.महाविकास आघाडी सरकार असताना मुश्रीफ यांनी पालकमंत्रिपदाची अपेक्षा जाहीरपणे बोलून दाखवताना सतेज पाटील यांनी मोठं मत दाखवावं, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांच्या या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवत महाडिक म्हणाले, पालकमंत्रिपदावर मुश्रीफ यांचा की दीड वेळा निवडून आलेल्या ‘त्यांचा’ हक्क होता. मुश्रीफ कॅबिनेट मंत्री असताना त्यांना अहमदनगरचे पालकमंत्रिपद स्वीकारावे लागले आणि हे राज्यमंत्री असताना कोल्हापूरचे पालकमंत्री झाले. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाचे प्रमुख नेते असतानासुध्दा ज्यांनी मुश्रीफ यांना पालकमंत्रिपद मिळू दिले नाही, त्याचा आता कागलकरांनी वचपा काढावा, असे महाडिक यांनी सांगितले.
मुश्रीफांचं पालकमंत्रिपद काढून घेतले, आता वचपा काढा; धनंजय महाडिक यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 4:41 PM