कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची सत्ता पुन्हा येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या बँकेत अध्यक्षपदाची संधी मिळाली तर आनंदच वाटेल, असे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना म्हटले आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
आमदार पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा सुरू असताना बँकेचे अध्यक्षपद प्रत्येकी अडीच वर्षांसाठी वाटून घ्यायचे ठरले होते. पहिल्या अडीच वर्षांसाठी मी अध्यक्ष होतो असे म्हटले होते. परंतु, मुश्रीफ यांनी पहिल्यांदा आपल्याला संधी द्यावी असा आग्रह धरला व त्यानुसार ते अध्यक्ष झाले.
परंतु, अडीच वर्षांनंतर त्यांनी अध्यक्ष बदलाबाबत नाव काढले नाही व तसा विषयही चर्चेत आला नाही. आता कागलला सलग पाच वर्षे अध्यक्षपद मिळाले असल्याने करवीर तालुक्यास ही संधी मिळावी अशी भावना कार्यकर्त्यांतून आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास त्याचा जरूर आनंद वाटेल व आताही चांगले काम करून दाखवेन. शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करण्याची संधी म्हणून मी या घडामोडींकडे पाहत आहे.
ते म्हणाले, बँकेत मी पस्तीस वर्षे संचालक आहे. त्यातील वीस वर्षे बिनविरोध निवडून आलो. १९९० ते ९५ या काळात सलग पाच वर्षे अध्यक्ष होतो. बँकेच्या स्थापनेपासून ५२ वर्षात १०२ शाखा होत्या. मी अध्यक्ष झाल्यावर नव्या ५४ शाखा काढल्या. ठेवी २२५ कोटी होत्या त्या ५४३ कोटींवर नेल्या. बँकेच्या इतिहासात भूमिहीन शेतकऱ्याला म्हैस घेण्यासाठी कर्ज मंजूर केले.
आयकर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांना लाभ द्या
आयकर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण बँकेत राबविले. साखर कारखान्यांना पूर्वी १४ टक्के व्याजदर होता. तो आता दहा टक्क्यांवर आणला आहे. बँकेचा साखर कारखान्यांना २७०० कोटींचा अर्थपुरवठा आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज व्याजमुक्त दिले पाहिजे असा आग्रह धरून तो निर्णय करून घेण्यात पुढाकार घेतला. आता हेच कर्ज पाच लाखांपर्यंत बिनव्याजी दिले जाणार आहे.