कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील गरगटे चाळीतील पत्र्याच्या बंदिस्त खोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १६) रात्री छापा टाकून साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्याच्या साठ्यासह स्पिरीट जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक केली. विनायक पांडूरंग सोनटक्के (वय २१), सुहास महावीर मारसुते (२४), सचिन महादेव सादळे (३३, तिघे रा. शेळके मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
संगणमताने विदेशी बनावट दारु तयार करुन त्या विविध ब्रँन्डच्या बाटलीमध्ये पॅक करुन विक्री करीत असल्याची कबुली संशयितांनी दिली. ही दारु मानवी आरोग्यास घातक असून ती पिले नंतर व्यक्तिचा मृत्यूही होवू शकतो. बनावट विषारी विदेशी दारु बनविणाऱ्या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, त्याची चौकशी सुरु असलेची माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी बुधवारी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात सर्वत्र भरारी पथकांकडून अवैध मद्यसाठा वाहतुक व मद्य विक्री वर पाळत ठेवून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. अधीक्षक गणेश पाटील आणि उपअधीक्षक बापूसो चौगले यांना खबºयाकडून इचलकरंजी शहरामध्ये गरगटे चाळ येथे पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये बेकायदा अवैध बनावट विदेशी मद्य निर्मिती करीत असलेची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पथकाने साध्या वेशात पाळत ठेवून छापा टाकला.
यावेळी शेडच्या समोर एक व्यक्ती बॉक्स दूचाकी मोपेडवरती तसेच दोन व्यक्ती मद्याच्या बाटल्या बॉक्समध्ये ठेवत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. खोलीची झडती घेतली असता बनावट १८० मिलीचे विदेशी मद्यांचे भरलेले १५ बॉक्स, मद्य तयार करण्यासाठी लागणारे पाच प्लॅस्टीकचे काळ्या रंगाचे ५० मिली क्षमतेचे कॅन भरलेले २५० लिटरचे स्पिरीट, खोलीच्या कोपºयात गोणपाटामध्ये भरलेल्या देशी व विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या लेबल असलेल्या १३०० रिकाम्या बाटल्या, पाण्याचे बॉक्स, रिकामा ड्रम, तयार केलेले विदेशी मद्य, दोन दूचाकी असा सुमारे साडेचार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे काय, याची चौकशी सुरु आहे. अधिक तपास निरीक्षक संभाजी बरगे करीत आहेत.इचलकरंजी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १६) बनावट विदेशी मद्यसाठ्यासह स्पिरीट जप्त करुन तिघांना अटक केली.