इचलकरंजी : गणेशोत्सवाच्या कालावधीत डॉल्बीमुक्तीचा निर्धार पोलिसांनी केला असला तरी सहाव्या, सातव्या व नवव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी डोके वर काढीत असल्याने पोलिस यंत्रणेला नवीनच डोकेदुखी झाली आहे. आज, गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी वाजणार नाही, यासाठी मात्र पोलिसांची कसोटी लागणार असून, धावपळ उडणार आहे.चालूवर्षीचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त राहील, यासाठी पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सुरुवातीला घोषणा दिली. त्या पाठोपाठ जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी डॉल्बी रस्त्यावर आल्यास त्या मंडळाची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. शहरातील तिन्हीही पोलिस ठाण्यांनी त्यांच्या क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर नागरिकांच्या बैठका घेऊन डॉल्बीमुक्तीबरोबर गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी आवाहन केले. या बैठकांना वरिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा उपस्थित राहिले होते. या अधिकाऱ्यांकडून विशेषत: डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करावा, यासाठी विशेष करून प्रबोधन करण्यात आले.असे असले तरी सहाव्या दिवशी इचलकरंजी साऊंड असोसिएशनने गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजविलाच. याची खबर मिळताच पोलिसांनी मुख्य रस्त्यावर असलेल्या त्यांच्या या मिरवणुकीकडे धाव घेतली. डॉल्बीचा आवाज मोजला, तर तो १२१.२ होता. साहजिकच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जनरेटर व ट्रॅक्टर मालकांवरसुद्धा गुन्हा नोंदविण्यात आला. असेच प्रकार थोरात चौक, जय सांगली नाका, आदी परिसरात घडले. मात्र, पोलिसांनी तेथे जाऊन ते डॉल्बी बंद पाडले.अशी स्थिती असतानाच मंगळवारी गावभागातील टिळक रोडवर डॉल्बी वाजणार असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. कारण सायंकाळपासून ट्रॅक्टरवर जोडलेला हा डॉल्बी व जनरेटर रस्त्यावर उभा होता. सायंकाळी पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन संबंधितांना त्याबाबत डॉल्बी लावता येणार नाही, असा समज दिला. पण कार्यकर्ते काही ऐकत नव्हते. त्यामुळे पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे व पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे पोलिसांच्या फौजफाट्यासह त्याठिकाणी गेले. त्यांनी डॉल्बीचा मिक्सर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यकर्त्यांकडून त्यांना अटकाव होत असताना पोलिसांनी आपला खाक्या दाखवून तो डॉल्बी बंद पाडला, असे असले तरी जुना चंदूर रोड आणि जवाहरनगर परिसरामध्ये तीन-चार ठिकाणी डॉल्बी वाजल्याच्या घटना झाल्या. तेथेही पोलिसांना जाऊन हस्तक्षेप करावा लागला.अशा पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी अनंत चतुर्दशी असून, गणेशोत्सवाचा हा अखेरचा दिवस म्हणजेच गणेश विसर्जनाचा दिवस असल्यामुळे काही ठिकाणी डॉल्बी वाजविण्याची तयारी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. पोलिस यंत्रणा त्याबाबत सजग असली तरी दोन बेस, दोन टॉप अशा सिस्टीमचा डॉल्बी वाजविण्यास कोणतीही हरकत नाही, असा समज काही मंडळांचा झाला आहे. मात्र, आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पोलिस निश्चितपणे कारवाई करणार असल्याने आज, गुरुवारी पोलिस व मंडळांचे कार्यकर्ते यांच्यात वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)डॉल्बीमुक्तीचा ६४ मंडळांचा नाराअशा पार्श्वभूीवर गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ६४ सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बी न वाजविता मिरवणूक काढण्याचा निर्णय पोलिसांना कळविला आहे. अशा मंडळांची नावे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेला नैतिकतेचे बळ मिळाले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
इचलकरंजीत डॉल्बीमुक्तीसाठी पोलिसांची कसोटी
By admin | Published: September 14, 2016 9:44 PM