मिरज : इचलकरंजी येथील पस्तीसवर्षीय तरुणाला स्वाईन फ्लू झाला असून त्याला उपचारासाठी भारती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असून, स्वाईन फ्लूचा रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.इचलकरंजीत कोळसा कारखान्यात काम करणाऱ्या तरुणास धाप लागून श्वासोच्छवासास त्रास होत असल्याने उपचारासाठी मंगळवारी भारती रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत रक्त नमुन्यांच्या तपासणीत त्याला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर अतिदक्षता विभागातील स्वतंत्र कक्षात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागणार असल्याचे ‘भारती’च्या वैद्यक तज्ज्ञांनी सांगितले. स्वाईन फ्लू हा हवेतून संसर्ग होणारा आजार असल्याने याबाबत इचलकरंजी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आली आहे. संबंधित तरुणाच्या घरातील व संपर्कातील व्यक्तींचेही प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. स्वाईन फ्लूचा रूग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. (वार्ताहर)
इचलकरंजीत ‘स्वाईन’चा रूग्ण
By admin | Published: January 30, 2015 11:30 PM