लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना व विक्रेत्यांवर भरारी पथकाने मंगळवारी कारवाई केली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील, उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी रस्त्यावर उतरून थेट कारवाई केली. यामध्ये नियम मोडणाऱ्यांचे साहित्य जप्त केले. यावेळी शहरातील दुपारी चारनंतर आस्थापना व विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करत आज, बुधवारपासून दंडात्मक कारवाईचा इशारा दिला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना दुपारी चारनंतर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तरीही नियम डावलून व्यवसाय सुरू होते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. याची दखल घेत मंगळवारी प्रांताधिकारी, अप्पर तहसीलदार व उपमुख्याधिकारी यांच्यासह पालिकेच्या आरोग्य विभागाचे खेमचंद लालबेग, अतिक्रमण विभागाचे सुभाष आवळे, सचिन जाधव व कर्मचारी थेट कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.
महात्मा गांधी पुतळा, सुंदर बाग, थोरात चौक, डेक्कन चौक, राधाकृष्ण टॉकीज, झेंडा चौक, के. एल. मलाबादे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती शाहू पुतळा परिसर यासह मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांना व्यवसाय बंदचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी व फेरीवाल्यांनी तत्काळ त्यांचे व्यवसाय बंद केले; परंतु वारंवार सूचना देऊनही कल्पना टॉकीज समोरील व्यापाऱ्यांनी आस्थापने सुरू ठेवल्याने अधिकाऱ्यांनी दुकाने बंद केली. यामध्ये पाच व्यापाऱ्यांवर प्रत्येकी एक हजारांचा दंड केला. यावेळी काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. आज, बुधवारपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
फोटो ओळी
१००८२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना व विक्रेत्यांवर प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी कारवाई केली.
१००८२०२१-आयसीएच-०६
चप्पल दुकानावर कारवाई करून तेथील ग्राहकांना बाहेर काढून दुकान बंद केले.
सर्व छाया-उत्तम पाटील