कोल्हापूर : कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याच्या संशयातून ‘ईडी’च्या पथकाने कोल्हापूरसह इचलकरंजी व जयसिंगपूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, माजी नगरसेवक, प्रसिद्ध सराफ व्यापारी, नामवंत डॉक्टर अशा चौघांच्या घर, कार्यालय, सराफ दुकान, हॉस्पिटल, फार्महाऊसवर मंगळवार-बुधवारी असे दोन दिवस छापे टाकले. पथकाने याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. या छापासत्राने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बहुमजली इमारती बांधून गेल्या दहा ते पंधरा वर्षांत नाव कमावलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाचे नाव जिल्ह्यात आदराने घेतले जाते. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात. मात्र, बांधकाम व्यवसायातून त्यांनी कोट्यवधींची माया जमा केल्याचे समजते.गेल्या अनेक वर्षांपासून इचलकरंजीत वेगवेगळे उद्योग करून एका माजी नगरसेवकाने मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमविली आहे. त्यांनी करही भरलेले नाहीत. येथीलच एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकानेही आपले जाळे पसरले आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्याने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केली आहे. जयसिंगपूर परिसरातील नामवंत डॉक्टरही दोन वर्षांपासून प्राप्तिकर विभागाच्या रडारवर होता. या चौघांच्या नावांची यादी ‘ईडी’ (अंमलबजावणी संचालनालयास) मिळाली होती. त्यामुळे मंगळवारी (दि. १८) रात्री ‘ईडी’ची चार पथके कोल्हापुरात दाखल झाली. त्यांनी दोन दिवस बांधकाम व्यावसायिक, माजी नगरसेवक, डॉक्टर व सराफ व्यावसायिकाचे घर, कार्यालय व साईटवर, हॉस्पिटल, फार्म हाऊसवर छापे टाकून मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
मात्र, याबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. आणखी एक-दोन दिवस हे पथक तळ ठोकून असणार आहे. चौघांच्या मालमत्तेची चौकशी करून बेहिशेबी मालमत्ता आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे समजते.