इचलकरंजी : बांग्लादेशातील हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने शुक्रवारी (दि.१६) इचलकरंजी बंद पुकारण्यात आला आहे. संध्याकाळी मुख्य रस्त्यावर मानवी साखळी तयार करून बंदची सांगता करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवजी व्यास, सनतकुमार दायमा, सुजित कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बांग्लादेशामध्ये हिंदूवर अत्याचार सुरु आहेत. याच्या निषेध नोंदविण्यासाठी इचलकरंजी बंदचे आवाहन सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. या दिवशी शहरातील सर्व व्यापारी, वाहतूकदार, कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, शाळा-महाविद्यालय यासह आठवडी बाजार यांनी त्यांचे सर्व उद्योग व्यवसाय बंद ठेवून एकजुटीने इचलकरंजी बंदमध्ये सहभागी व्हावे.प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर मानवी साखळी करून आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे.
बेकायदेशीर बांग्लादेशी घुसखोर व रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलावे. बांग्लादेशाने त्यांच्या देशात हिंदूवर अत्याचार होत असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. त्यामुळे हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करावी अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रकार परिषदेस प्रवीण सामंत, अरविंद शर्मा, कपिल शेटके, सर्जेराव कुंभार, अमृत भोसले, मंगेश मस्कर, प्रसाद जाधव उपस्थित होते.