इचलकरंजी : गुंठेवारी नियमित भूखंडाच्या खरेदीपत्राची नोंद व शेतीतील पूर्ण क्षेत्राची खरेदी व्हावी, अशा मागणीचे निवेदन इस्टेट ब्रोकर असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले. निवेदनात, दहा दिवसांपासून खरेदीपत्र नोंदविण्याचे काम थांबविले आहे. संबंधित दुय्यम निबंधकांना गुंठेवारी नियमित खरेदीपत्राचे व्यवहार सुरू करावेत, अशा सूचना द्याव्यात, असे म्हटले आहे.
ओंकार हुपरे याचा गौरव
इचलकरंजी : मर्दानी क्रीडा प्रकारात सलग आठ तास काठी फिरवून विक्रमाची जीनियस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या ओंकार हुपरे याचा सत्कार दि न्यू हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अरुणराव खंजिरे व बाळकृष्ण मुरदंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक एस. ए. पाटील, आदी उपस्थित होते.
नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
इचलकरंजी : येथील रोटरी क्लबच्यावतीने खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील गजानन महाराज मंदिरात नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर ३ सप्टेंबरला दुपारी १ ते ४ या वेळेत होणार आहे. शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार असून, मोतिबिंदू असणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे तरी खोतवाडी, तारदाळ, यड्राव, जांभळी, कोंडिग्रे, आदी भागांतील नेत्ररुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सॅनिटायझर व मास्क वाटप
कबनूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने खबरदारी म्हणून कबनूर हायस्कूलला इचलकरंजी रोटरी क्लब सेंट्रलकडून विद्यार्थ्यांसाठी दहा लिटर सॅनिटायझर व २०० मास्क शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी यतीराज भंडारी, राजू तेरदाळे, श्रीकांत माळी, प्रशांत कांबळे, जी. जी. लंबे, आदी उपस्थित होते.