इचलकरंजी : शहरामधील प्रमुख चौक असलेल्या शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, शिवतीर्थ या नावाने सव्वातीन कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुशोभीकरणामध्ये डोंगरकपारी आणि त्यावरील किल्ला अशाप्रकारची संरचना करण्यात येणार आहे. हा परिसर दोन टप्प्यांमध्ये विकसित केला जाणार आहे.
जनता चौक ते कोल्हापूर रस्ता आणि हवामहल चौक ते स्टेशन रोड या दरम्यान असलेल्या चौकात सुमारे ४५ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. आता या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपालिकेने आराखडा करून घेतला आहे. या आराखड्यासाठी इतिहास संशोधक रमेश भिवरे, आमदार सुरेश हाळवणकर, संभाजीराव भिडे, आदींचे मार्गदर्शन घेतले आहे. शिवाजी महाराजांचा चबुतरा असलेला गोल परिसर आणि त्याच चौकातील चारही बाजूला छोट्या स्वरूपाची चार स्मारके, असे या सुशोभीकरणाचे स्वरूप आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे, प्रतापराव गुजर, बाजी पासलकर अशा आठ सेनापतींचे पुतळे उभे केले जाणार आहेत.
पुतळ्याच्या एकाबाजूला बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशीद यांची प्रतिकृती, तसेच दुसऱ्या बाजूला शिवमुद्रा बसविली जाणार आहे. सध्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी उभारण्यात आलेली लोखंडी शिडी काढून त्याठिकाणी हायड्रोलिक पद्धतीची लिफ्ट बसविण्यात येणार आहे. खालील बाजूस डोंगराप्रमाणे ओबड-धोबड अशा परिसरावर हिरवळ आणि त्यानंतर तटबंदी असणार आहे. या तटबंदीवर चार ठिकाणी तोफा ठेवल्या जाणार आहेत.
दुसºया टप्प्यामध्ये चौकातील रस्त्याच्या जलशुद्धिकरण केंद्रालगत महाराणी ताराराणी व राजाराम महाराज यांचे छोटेसे स्मारक, वाहतूक शाखेलगत संभाजीराजे व येसूबाई यांचे छोटे पुतळे, उडपी हॉटेलजवळ राजमाता जिजाऊ व छोटे संभाजीराजे यांचे स्मारक आणि एस. टी. स्टॅण्डलगत छत्रपती शहाजीराजे व शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचे छोटे पुतळे उभारण्यात येणार आहेत. यासाठी केल्या जाणाºया विद्युत रोषणाईच्या वाहिन्या भूमिगत असणार आहेत.
शिवतीर्थ विकासासाठी समितीशिवाजी पुतळा येथे शिवतीर्थाचे सुशोभिकरण करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने मुंबई येथील चेंबूर, अकलूज येथील शिवसृष्टी, पन्हाळा, कोल्हापूर, सांगली, आदी ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराज व त्यांच्या स्मारकांना भेटी दिल्या आणि त्यातून ही संकल्पना साकारण्यात आली आहे.
इचलकरंजीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात साकारण्यात येणाऱ्या संकल्पित शिवतीर्थाचे छायाचित्र.