अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : हागणदारीमुक्त शहर, स्वच्छ सर्वेक्षण योजनेत देशात ८९ वा क्रमांक मिळविलेली इचलकरंजी नगरपालिका आणि सत्य परिस्थितीतील शहर यामध्ये खूपच तफावत आहे. शहरातील पे अॅण्ड युज शौचालय दुपारच्या वेळेत बंद असतात. अनेक ठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी असते. त्यातच कचरा कोंडाळ्याने अधिकच विद्रूपीकरण होते. मग नगरपालिकेचा स्वच्छतेवर होणारा लाखो रुपयांचा खर्च नेमका कशासाठी केला जातो, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरात सुमारे ३० पे अॅण्ड युज शौचालये आहेत. त्यातील दोन बंद आहेत, तर तीन बंद स्थितीत आहेत आणि ज्याठिकाणी सुरू आहे, तेथे दुपारी दोन तास बंद असतात. बंद असलेल्या शौचालयांसमोर लहान मुले उघड्यावरच शौचास बसतात. मोठ्या व्यक्ती नाईलाजास्तव आडोसा शोधतात, तर काहीजण त्यासाठी पैसे खर्च होतात म्हणून रात्रीच्या वेळी उघड्यावरच शौचाला जातात. परिणामी हागणदारीमुक्त शहर या संकल्पनेला खो बसला आहे.
सर्वेक्षणच्या कालावधीत नगरपालिकेकडून ठिगळ लावल्याचे काम केले जाते. त्यानंतर पुन्हा दुर्लक्ष होते. ठेकेदार पैसे मिळवून रिकामे होतात. संबंधिताला त्यातील 'लाभ' मिळतो. या सर्व खेळात शासनाची स्वच्छता मोहीम कागदावरच राहते. शासनाकडून नगरपालिकेमार्फत शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. अनेक कुटुंबांनी हे अनुदान घेतले आहे. परंतु अद्यापही शौचालय नसलेले कुटुंब आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.
चौकटी
मुताऱ्यांची अवस्थाही अशीच
शहरात मुख्य मार्गासह बाजारपेठ, शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा वर्दळीच्या ठिकाणी मुताऱ्या होत्या. कालांतराने वशिलाबाजीने एक-एक करून बहुतांश मुताऱ्या पाडण्यात आल्या आहेत. त्या जागी पुन्हा मुतारी उभा करण्यात आली नाही. परिणामी साखर व किडनीचा त्रास असणाऱ्या नागरिकांना अडचणीच्या वेळी लघुशंकेसाठी उघड्यावरच थांबावे लागते.
झोपडपट्टी परिसरातील शौचालये मोफत करण्याची गरज
झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या गरीब नागरिकांना शौचालयासाठी पैसे खर्च करणे याबाबत जागरूकता नाही. परिणामी तो खर्च वाचविण्यासाठी बहुतांश जण रात्रीच्या वेळी उघड्यावर शौचाला जातात. त्यामुळे अशा परिसरांजवळ असणाऱ्या पे अॅण्ड युज शौचालयाला मोफत केल्यास संबंधित नागरिक शौचालयाचा वापर करतील.
मुख्य चौक स्वच्छता जेमतेमच
शहरातील चौक स्वच्छता करण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून नियमानुसार काम होत नाही. याबाबत नगरसेवक शशांक बावचकर यांनी वेळोवेळी आवाज उठविला, तक्रार केली. परंतु म्हणावी तशी सुधारणा झाली नाही.
फोटो ओळी
०९०७२०२१-आयसीएच-०५
शहरातील शाहू हायस्कूल परिसरात असलेले पे अॅण्ड युज शौचालय दुपारच्या वेळी बंद असल्याने लहान मुले उघड्यावर शौचाला बसतात.
०९०७२०२१-आयसीएच-०६
स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात केलेल्या भिंतीसमोरच कचरा कोंडाळा निर्माण झाला आहे. तेथे भटक्या कुत्र्यांचाही वावर असतो.