अतुल आंबी ।इचलकरंजी : सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील सर्व चौक, सर्व रस्ते याठिकाणी ७३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी मिळाली. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये ११२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये ११ पीटीझेड कॅमेऱ्यांचा समावेश आहे. तीन टप्प्यांत ही योजना पूर्ण होणार आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे काम झाले आहे. गुन्हेगारी कारवायांसह अपघात, चोरी व वाहतुकीची शिस्त यानिमित्ताने सुरळीत होणार आहे.
जिल्हा नियोजन व विकास समिती समाज कल्याण विभाग व इचलकरंजी नगरपालिका यांच्यावतीने ही योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी चार कोटी आठ लाख रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. या सर्व कॅमेºयांचे नियंत्रण नव्याने पुरवठा कार्यालयालगत सुरू झालेल्या पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. तेथे चार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, शुक्रवारपासून एक महिला कर्मचारी रुजूही करण्यात आली आहे. चारही कर्मचाºयांमार्फत दोन शिफ्टमध्ये २४ तास सर्व कॅमेºयांवर नजर ठेवली जाणार आहे.पहिल्या टप्प्यात एक कोटी ३३ लाखांचा निधी खर्च करून सर्व प्रमुख मार्ग ११२ कॅमेºयांच्या नजरेखाली आणले आहेत.
दुसºया टप्प्यात उपरस्ते व उपचौक, त्यानंतर तिसºया टप्प्यात सर्व अंतर्गत रस्ते, लहान-मोठे चौक, तसेच इचलकरंजीमध्ये येणारे-जाणारे मार्ग नजरेखाली येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी शहर २४ तास सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व सुरक्षितता यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनीही मागणी केली होती.
त्यानुसार या योजनेला सेफ सिटी प्रकल्पांतर्गत मंजुरी मिळाली. येत्या नवीन वर्षात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्व कॅमेºयांवरून वाहनचालकांवर लक्ष ठेवले जाणार आहे.तिबल सीट, मोबाईलवर बोलत गाडी चालविणे, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, वन वे, फॅन्सी नंबर प्लेट, असे नियम न पाळणाºयांना कायदेशीर नोटीस पाठविण्यास सुरुवात केली जाणार आहे.