इचलकरंजी : शासनाने इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून मंजूर केलेली नळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी व पिण्यासाठी हक्काचे पाणी द्यावे, या मागणीसाठी इचलकरंजीत आज, सोमवारी बंद व सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी मोठे आंदोलन होत आहे.इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने येथे प्रामुख्याने कामगार व यंत्रमागधारक यांच्यामध्ये आपल्या हक्कासाठी झालेला संघर्ष अनेकवेळा नागरिकांनी अनुभवला आहे. मोर्चा, प्रतिमोर्चा, उपोषण, उद्योग बंद, शहर बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने येथे झाली आहेत. पंचगंगा नदी दूषित झाल्याने कृष्णा नदीतून शासनाने नळ योजना कार्यान्वित करावी, यासाठी २५ वर्षांपूर्वी व्यंकोबा मैदानात पाणी परिषदही झाली आहे. कोल्हापूर शहराप्रमाणेच काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी मिळावे, यासाठी नगरपालिकेने केलेली मागणी ही योजना किफायतशीर होणार नाही, या कारणास्तव शासनाने फेटाळली. मात्र, त्याचवेळेला इचलकरंजीसाठी किफायतशीर नळ योजना देण्यासाठी शासनाकडून जीवन प्राधिकरणामार्फत सर्वेक्षण झाले. नोव्हेंबर सन २०१५ मध्ये जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांच्या पथकाने सर्वेक्षण करून दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून पाणी योजना राबविण्यासाठी शिफारस केली.त्याप्रमाणे जून २०१६ मध्ये शहरास ६८.६८ कोटी रुपयांच्या वारणा नळ योजनेला मान्यता मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ एप्रिल २०१७ रोजी या योजनेचे ई भूमिपूजन केले.इचलकरंजी शहराने पाणी योजना राबविल्यास वारणा नदीच्या काठावरील गावांना पाणी कमी पडेल. ज्यामुळे शेतीतील पिकांना पाणीटंचाई भासेल, अशा समजातून वारणा काठावरील गावांनी इचलकरंजीच्या या योजनेस विरोध केला आहे. प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या पातळीवर झालेल्या सात बैठकांतून तोडगा निघाला नाही. २ मे रोजी नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी दानोळी येथे गेलेल्या प्रशासन व पोलीस यंत्रणेला जोरदार विरोध झाला.अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजीकरांना शासनाने मंजूर केलेले पिण्याचे आरक्षित पाणी मिळावे, त्यासाठी नळ योजना युद्धपातळीवर राबवावी, यासाठी इचलकरंजीमध्ये आता सर्वपक्षीय आंदोलन उभे राहू लागले आहे.त्याचाच एक टप्पा म्हणून आज, सोमवारी शहर बंद ठेवून सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला आहे.१ टीएमसी पाण्यासाठी होणारा विरोध अनाकलनीयवारणा धरण प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४.३६ टीएमसी आहे. त्यापैकी २७.५० टीएमसी जलसाठा उपयुक्त आहे. त्यामध्ये १०.८१ टीएमसी पाणी पिण्यासाठी व उद्योगासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. तर शेती सिंचनासाठी १६.६९ टीएमसी पाणी आरक्षित आहे. सध्या वारणा काठावरील सर्व गावे आणि इचलकरंजीसाठी आरक्षित असलेल्या एक टीएमसी पाण्यासह ५.३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित असून, अद्यापही ५.४६ टीएमसी पाणी शिल्लक आहे. म्हणजे शेती सिंचनासाठी १६.६९ टीएमसी पाणी व पिण्यासाठी आरक्षित असलेल्या पाण्यापैकी ४.४६ टीएमसी पाणी शिल्लक असतानाही इचलकरंजीला केवळ एक टीएमसी पाणी देण्यासाठी झालेला विरोध अनाकलनीय आहे.
वारणा पाणी योजनेसाठी इचलकरंजीत आज बंद, मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:46 AM