इचलकरंजी : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील दि इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिलची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळी खेळीमेळीत पार पडली. कोरोनामुळे शासन निर्देशांचे पालन करीत ही सभा घेण्यात आली.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. चंद्रशेखर स्वामी यांनी दुखवटा ठरावाचे वाचन करून सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळत आदरांजली वाहिली.
अध्यक्ष मोहन भिडे यांनी मिलच्या कामकाजाचा आढावा घेतला. वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्माण झालेली मंदी व कोरोनामुळे सर्वच उद्योगात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उत्पादनावर मर्यादा पडत आहेत. संस्थेचे सर्व सभासद, संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे मिलचे कामकाज सुरू आहे. भविष्यात ही संस्था पूर्ववत सुरू होऊन प्रगतिपथावर नेऊ, अशी ग्वाही भिडे यांनी दिली.
प्रभारी कार्यकारी संचालक ए. बी. कोतवाल यांनी सभेची नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. त्यास सभासदांनी मंजुरी दिली. सभेसाठी प्रकाश दत्तवाडे, मुकुंद माळी, बाळासाहेब कलागते, माधव माळकर, विठ्ठल सुर्वे, राजू माने, अंजली बावणे, सुमन गोरे यांच्यासह सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष एम. के. कांबळे यांनी आभार मानले.
फोटो ओळी
०८०३२०२१-आयसीएच-०२
शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील दि इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिलच्या वार्षिक सभेत अध्यक्ष मोहन भिडे यांनी मार्गदर्शन केले.