इचलकरंजी : पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मृत डुक्कर आणून टाकल्याप्रकरणी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी आंदोलनकर्ते बंडोपंत मुसळे यांच्यासह पंधराजणांवर शासकीय कामात अडथळा व शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान, नगरपालिका कामगार संघटना व आंदोलनकर्त्यांचे समर्थक असा मोर्चा-प्रतिमोर्चा शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर काढण्यात आला. त्यामुळे वातावरण तंग बनले होते.आंदोलनकर्त्यांनी विनापरवाना जमाव जमवून मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. घटनेनंतर पालिकेत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत आंदोलनकर्त्यांना अटक करा, अशी मागणी केली, तर मुसळे यांच्यावर गुन्हा दाखल होत असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच मुसळे यांच्या परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यामुळे पोलिस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण झाले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देऊन पाठविले. तसेच आंदोलनकर्ते मुसळे यांना अटक करू नका, अशी मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनाही कायदेशीर कारवाई होणार असून अटक करणार नसल्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी मुसळे यांना घेतल्याशिवाय हलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे सायंकाळपर्यंत आंदोलनकर्ते पोलिस ठाण्याच्या आवारात तळ ठोकून होते. शेवटी कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर मुसळे यांच्यासह पंधराजणांना सोडून देण्यात आले. दरम्यान, पत्नी मंगल या नगरसेविका असून त्यांनी भागातील समस्यांबाबत वारंवार सूचना व लेखी तक्रारी करूनही तीन महिने रसाळ यांनी दुर्लक्ष केले. त्यावरून मला व पत्नीला उद्धट उत्तरे देऊन अपमान करत वागणूक दिली. त्यांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांना दिले. (वार्ताहर)पेठवडगावमध्ये पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलनपेठवडगाव : इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये डुक्कर आणून टाकल्याचा निषेध वडगावच्या पालिका कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी संबंधित आंदोलकांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील, सतीश पकाले, सूर्याजी भोपळे, राजू शिंदे, शिवाजी सलगर, संतोष गुरव, आदीसह कर्मचारी उपस्थित होते. मध्यस्थीला अपयशनगरपालिकेतील अनेक नगरसेवक याप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. मुख्याधिकारी रसाळ यांनाही तक्रार दाखल न करण्यास विनंती केली. मात्र, त्यांनी तक्रार देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने प्रकरण मिटू शकले नाही. यावेळी अशोक जांभळे, दिलीप झोळ, महावीर जैन, भाऊसाहेब आवळे, सागर चाळके, प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते.
इचलकरंजीत मोर्चा-प्रतिमोर्चा
By admin | Published: September 18, 2016 12:30 AM