कोल्हापूर : ‘कोरोना’चे दोन रुग्ण पुण्यात आढळल्याने कोल्हापुरातील प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीची बैठक घेऊन ‘कोरोना’संदर्भात तत्काळ विशेष कृती आराखडा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. ‘कोरोना’साठी कोल्हापूर शहराप्रमाणेच इचलकरंजी व गडहिंग्लज येथे लवकरच ‘आयसोलेशन’ कक्ष लवकरच स्थापन करण्याचेही यावेळी ठरले.जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, आदींची होती.दुबईहून पुण्यात आलेल्या दोघाजणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. असे रुग्ण बाहेरून आपल्या जिल्ह्यात दाखल झाल्यावर तसेच आपल्याकडे असे रुग्ण आढळल्यास त्याचा कशा पद्धतीने सामना करायचा, या संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेष कृती आराखडा तयार करून तालुकानिहाय एका अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवा, त्यांच्याकडून आढावा घ्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्याधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर कोल्हापूर शहरात ज्याप्रमाणे ‘आयसोलेशन’ कक्ष सुरू केला आहे. त्याप्रमाणे इचलकरंजी व गडहिंग्लजलाही असे कक्ष स्थापन करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.