अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असली तरी त्याकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही, अशी ओरड नागरिकांतून सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेत्यांच्या, मंत्र्यांच्या वरचेवर बैठका होत आहेत. आढावा घेतला जात आहे, सूचना दिल्या जात आहेत; परंतु परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक जोर दिसत नाही. अतिशय संथगतीने या परिस्थितीला हाताळले जात आहे.
शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पहिल्या लाटेत इचलकरंजीत अतिशय कडक पद्धतीने अंमलबजावणी केली जात होती. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश मिळाले. मुंबईप्रमाणे इचलकरंजी शहरातही अतिशय दाट लोकवस्ती आहे. त्यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने शहरात कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचेही हाल सुरू आहेत. बाहेरच्या राज्यातील कामगार परतत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, इचलकरंजीमध्ये तसे होताना दिसत नाही.
विविध राजकीय पक्षांचे नेते, खासदार, मंत्री येतात, बैठका घेतात, सूचना देतात आणि निघून जातात. त्याची अंमलबजावणी मात्र तत्काळ होताना दिसत नाही. त्यावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे हेही समजून येत नाही. जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. नगरपालिका, आयजीएम रुग्णालय, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्यासह राजकीय नेत्यांनी समन्वय साधून एकत्रित भूमिका व नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
चौकटी
आवश्यक औषधांचाही तुटवडा
कोरोनावरील उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधे शहरातील मेडिकलमध्ये उपलब्ध नाहीत. पुरवठ्यापेक्षा अचानक मागणी वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
परंतु, प्रशासनाने त्यावर ताबडतोब मार्ग काढून औषध साठा उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.
ट्रेसिंग व टेस्ट वाढविणे आवश्यक
पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग व टेस्टिंग करून गरज असेल त्यांना तत्काळ उपचार सुरू करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर होम क्वारंटाईन राहून उपचार घेणारे, तसेच त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. नगरपालिका प्रशासनाने याबाबत यंत्रणा उभी करावी.
लसीकरणासाठी नियोजन आवश्यक
सध्या शहरात आयजीएम रुग्णालय व बारा केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. त्यातील अनेक ठिकाणी रुग्णांना योग्य बैठक व्यवस्था नाही. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला असतो. १ मेनंतर १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू केले जाणार आहे. सध्या मर्यादित संख्या असतानाही अशी परिस्थिती आहे, तर पुढे काय होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.