: अधिकारी व कर्मचारी हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वाढत्या कोरोना संसर्गावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने लसीकरणाची मोहीम हाती घेतली. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीकरण करण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने सर्वांना लस देण्यात येणार आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शहरातील लसीकरण केंद्रात लस देण्यासंदर्भात कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण अद्याप सुरू नाही.
शहरात सहा केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यातील लालनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बुधवारपासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे, असे आदेश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी संबंधित विभागाला दिले होते. यासंदर्भात आरोग्य राज्यमंत्र्याकडे लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. मात्र केंद्रावर प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झाले नाहीत. १८ ते ४४ वयोगटातील लस देण्यात येणार असल्याची माहिती समजल्यामुळे नागरिकांची लस घेण्यासाठी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी होती. परिणामी केंद्रावर गोंधळ उडाला होता. लस उपलब्ध झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कर्मचा-यांनाही वारंवार नागरिकांची समजूत काढावी लागत असल्याने ते हैराण झाले होते. अद्यापही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
आम्हाला कोणत्याही प्रकारचा आदेश किंवा वरिष्ठ अधिका-यांकडून याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. आम्हाला लस देण्यासंदर्भात सूचना मिळताच केंद्रावर लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण केंद्रावर गर्दी करू नये.
डॉ. मीनल पडिया, वैद्यकीय अधिकारी, लालनगर केंद्र
फोटो ओळी
२३०६२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीतील लालनगर केंद्राबाहेर फलक लावण्यात आला होता.