इचलकरंजी : जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या इचलकरंजीतील मटका, गावठी दारूअड्डे, अंदर-बाहर यासह अन्य आॅनलाईन पद्धतीचा मटका राजरोसपणे सुरू आहे. कोल्हापूर शहरातील मटक्यावर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी आता इचलकरंजीकडेही लक्ष वळवावे, अशी मागणी होत आहे.शहरातील अवैध व्यवसायाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने देशातील अनेक राज्यांतून लोक या ठिकाणी कामानिमित्त येऊन राहिले आहेत. त्यामध्ये कामगारांची संख्याही लक्षणीय आहे. मटका, जुगार, दारू, गुटखा अशा अनेक व्यसनांना कामगार बळी पडतात. त्यामुळे अशा अवैध व्यावसायिकांना येथील ग्राहकांच्या संख्येमुळे बळ मिळते. त्यामुळे असे अवैध व्यावसायिक आवश्यकतेनुसार पोलिस खात्यातील अधिकाऱ्याशी जुळवून घेत मागणीप्रमाणे पुरवठा करतात. सण, उत्सव, अमावास्या, पौर्णिमा, मंदी अशा कोणत्याही गोष्टींचा या धंद्यांवर परिणाम होत नाही. अधिकारी बदलले की, त्याप्रमाणे नियोजन लावले जाते. एखादा अधिकारी कडक पद्धतीचा आला, तर त्याचे नियोजन लावायला थोडा वेळ जातो. त्यानंतर सर्व काही अलबेल पद्धतीने सुरू राहते, अशी इचलकरंजी शहराची पार्श्वभूमी आहे. तीन वर्षांपूर्वी शहरातील वाढलेली गुन्हेगारी व अवैध व्यावसायिकांचा सुळसुळाट थांबविण्यासाठी तत्कालीन अधिकारी एस. चैतन्य यांनी कारवायांचा धडाका लावून सर्व काही नियंत्रणात आणले होते. त्यावेळी शहरामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची स्थापना करण्यात आली होती. त्या शाखेच्या प्रमुखपदी मानसिंग खोचे या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. चैतन्य व खोचे यांनी नियोजनबद्ध फिल्डिंग लावत गुन्हेगारी व अवैध व्यावसायिकांची मक्तेदारी मोडीत काढली. अशा व्यावसायिकांच्या संपर्कात व संबंधित असलेल्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवत कारवाईची फिल्डिंग लावली जात होती. त्यामुळे सर्व काही मोडीत काढण्यात यश मिळाले होते. ते अधिकारी बदलून गेल्यानंतर काही काळ त्यांच्या नावाचा दबदबा शहरात टिकून होता.त्यानंतर काळ बदलला, अधिकारी बदलले आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती सुरू झाली. नवीन अधिकाऱ्यांनी मोडून पडत आलेला अवैध व्यवसाय पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची आलेली संधी सोडून दिली. काही वेळ निघून गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचा दबदबा कमी झाला आणि पुन्हा अवैध व्यावसायिकांना उभारी मिळाली. प्रमुख अधिकाऱ्याचे नियोजन योग्य पद्धतीने लागल्याने सर्व व्यवसाय सुरळीतपणे सुरू झाले. या विळख्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात अडकत चालला असून, पगारात भागत नसल्याने सावकारांच्या जाळ्यात तो अडकत चालला आहे. अनेकांचे संसार मोडून पडत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी आता इचलकरंजीकडे लक्ष वळवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)नवीन अधिकारी नवीन कायदाअवैध व्यवसाय करणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना अधिकारी बदलला की, कायदाही बदलतो याची अनेकवेळा प्रचिती आली आहे. तसेच त्यांचे नियोजन वाढवून लावावे लागते, याचीही जाणीव आहे. त्यामुळे कारवाया सुरू झाल्यानंतर असे व्यावसायिक फिल्डिंग लावण्यासाठी राजकीय, सामाजिक व्यक्तींना मध्ये घालून प्रयत्न करीत असतात. कारवाया थांबल्या की, जनतेला कायदा बदलल्याचे समजते.अनेक पोलिस कर्मचारी अवैध व्यवसायात भागीदारशहरातील पोलिस ठाण्यांमधील अनेक पोलिस कर्मचारी अशा अवैध व्यावसायिकांसोबत त्यांच्या व्यवसायात भागीदार बनले आहेत. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन लावणे हे एकच काम तशा पोलिसांना दिलेले असते. त्यांचा रूबाबही अधिकाऱ्यांप्रमाणेच असतो. पोलिस दलातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अन्य पोलिसांना याबाबत माहितीही असते. मात्र, साहेबांचे नियोजन लावणाऱ्याच्या विरोधात बोलणार कोण?
इचलकरंजीतील अवैध धंदे राजरोसपणे सुरूच !
By admin | Published: February 07, 2017 12:46 AM