इचलकरंजी : शहरात चोरी व घरफोडी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या दोघांना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेले. ओंकार बाबासाहेब गेजगे (वय २८, रा. महात्मा गांधी हौसिंग सोसायटी) व सिद्धार्थ शामराव कांबळे (२९, रा. तिळवणी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास हे दोघेजण शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या आवारात लपून बसलेले पोलिसांना मिळून आले. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
'आयजीएम'ला तीन व्हेंटिलेटर प्रदान
इचलकरंजी : येथील आयजीएम हॉस्पिटलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांतून तीन व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. नगराध्यक्षा अलका स्वामी व मान्यवराच्या हस्ते व्हेंटिलेटर वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्रकुमार शेट्ये यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक राहुल खंजिरे, रवींद्र माने, शहाजी भोसले, धनाजी मोरे, राजू आरगे उपस्थित होते.
पंडित नेहरूंना अभिवादन
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त सभागृहात नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी प्रतिमेचे पूजन केले. या वेळी नगरसेवक युवराज माळी व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. तसेच शहर काँग्रेस समितीच्या वतीने शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मीना बेडगे यांनी प्रतिमेचे पूजन केले. या वेळी नगरसेवक शशांक बावचकर, शशिकांत देसाई, बाबसो कोतवाल, रियाज चिकोडे, प्रशांत लोले उपस्थित होते.