लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : गरीब, गरजू व निराधार लोकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत होता. किमान एकवेळच्या जेवणाची सोय होत असल्याने फिरस्त्यांच्या पोटात दोन घास जात होते. मात्र, जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने शिवभोजन थाळीवर अवलंबून असणाऱ्या गरजूंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे काही नियम व अटींवर केंद्र सुरू करण्याची आवश्यकता भासत आहे.
इचलकरंजी शहरात मोठे तळे, पाटील मळा, डेक्कन रोड व गणेशनगरजवळ अशा चार ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या चार केंद्रांत दररोज एकूण ५६१ लोकांना थाळी दिली जाते. लोकसंख्येच्या प्रमाणात थाळ्यांची संख्या अल्प असली तरी काहीजणांना याचा मोठा आधार मिळत होता. परंतु लॉकडाऊनमुळे शिवभोजन थाळीवर अवलंबून असणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत.
शहर व परिसरात अनेक सामाजिक संस्था व संघटनांमार्फत घरपोच किंवा जागेवर जाऊन जेवण पोहोच केले जात आहेत. मात्र, त्यांच्यावर नियमांचे बंधन येत असल्यामुळे शहरातील अनेक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व शिवभोजन केंद्र बंद केल्यामुळे अनेकांना एकवेळच्या जेवणापासून देखील वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होताना दिसत आहे.
प्रतिक्रिया
शहरात कडक लॉकडाऊन असल्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार शिवभोजन थाळी केंद्र बंद केले आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून केंद्र सुरू करण्यासंदर्भात कोणताही आदेश प्राप्त होत नाही, तोपर्यंत केंद्र बंदच ठेवावे लागणार आहे. याचा गरिबांना त्रास सहन करावा लागत आहे.
अरुण साळुंखे, शिवभोजन थाळी केंद्रचालक
शिवभोजन केंद्र बंद असल्यामुळे फिरस्त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. काही जण रोज केंद्रावर येऊन थोड तरी अन्न द्या, दोन घास तरी मिळू देत, अशी विनवणी करत असतात. अनेक फिरस्ते व गरजू केंद्रावर मिळणाऱ्या जेवणावरच अवलंबून असतात. त्यांचा विचार करता प्रशासनाने निर्णयात थोडाफार बदल करावा.
ज्ञानेश्वर पिसे, शिवभोजन थाळी केंद्रचालक
फोटो ओळी
२००५२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत लॉकडाऊन जाहीर केल्याने शिवभोजन केंद्र बंद आहे. त्यामुळे गरजूंवर उपासमारीची वेळ आली आहे.