आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी बोगस बेडाजंगम या जातीच्या दाखल्याच्या आधारे एस.सी. या प्रवर्गाच्या आरक्षीत नगररचना पदाची निवडणूक लढवून ती जिंकली आहे. राजकीय दबावापोटी जातपडताळणी विभागाकडून हे जातीचे प्रमाणपत्र त्यांनी मिळविल्याचा आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस अरुण नेमीनाथ कांबळे यांनी कोल्हापुरात मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. या बोगस जातीच्या दाखल्याबाबत गुरुवारी औरंगाबाद उच्च न्यायालयात अपील दाखल केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कांबळे म्हणाले, अलका स्वामी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अर्ज सादर केल्याने त्यांचा जन्म बीडमध्ये झाल्याचे दिसते; पण जन्मदाखला गडहिंग्लज नगरपरिषदेतून मिळाला, त्यावर त्यांची जात ‘लिंगायत’ असे नमूद आहे. ही कागदपत्रे आम्ही बीड येथील जातपडताळणी समितीसमोर सादर केली; पण स्वामी यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून गडहिंग्लज गावाशी जन्माशिवाय कोणताही संबंध नसल्याचे सांगितले तसेच त्यांनी स्वत:चे वडील पेठ सांगवी (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथील असल्याची खोटी कागदपत्रे तयार करून जातपडताळणी बीड येथे सादर केली. यासाठी त्यांनी पेठ सांगवी गावचे जनगणना रजिस्टर १९५१ मध्ये राजकीय दबावाचा वापर करून आपल्या बोगस वडील, आजोबा, चुलते, चुलती यांची नावे नमूद केल्याचाही आरोप केला.
निवडणूक अर्जामध्ये स्वामी यांनी आजोबांचे नाव सातया तिपया गणाचारी असे नमूद केले आहे तर बोगस सादर केलेल्या रजिस्टरमध्ये त्यांनी आजोबाचे नाव सातया महालिंग असे नमूद केले असून त्यांनी कागदपत्रांत बोगस वडिलांसह आजोबाही बदलल्याचा आरोप कांबळे यांनी केला. या बोगस दाखल्याबाबत हातकणंगले तहसीलदारांकडेही तक्रार केल्याचे कांबळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, नेहाल नावले हे ही उपस्थित होते.
जातपडताळणी समितीसमोर या दाखल्याबाबत चारवेळा सुनावणी होऊन प्रमाणपत्र दिले आहे. तक्रारदारांचा अर्ज समितीने फेटाळला आहे. अरुण कांबळे हे ‘ब्लॅक मेलिंग’ करण्याच्या उद्देशाने आमची बदनामी करत असल्याचा खुलासा इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांनी न्यायालयात तक्रार केल्यास त्यासंदर्भात नोटीस निघाल्यानंतर जातपडताळणी समिती आणि आम्ही आमचे म्हणणे मांडू, असेही स्वामी यांनी सांगितले.