इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगात असलेल्या सातत्याच्या मंदीमुळे उद्योग अत्यंत अडचणीत आला आहे. तरी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंत्रमागधारक संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने सोमवारी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यानंतर तेथे प्रांताधिकारी समीर शिंगटे व महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमान्ना कोळी यांना निवेदन देण्यात आले. यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने वीज दर सवलत, यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात सूट, तसेच विविध सवलतींचे पॅकेज द्यावेत, अशी मागणी गेली तीन वर्षे करूनसुद्धा शासन उदासिन आहे. म्हणून सोमवारी राज्यातील यंत्रमाग केंद्रांमधून विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. त्यास अनुसरून इचलकरंजीत मोर्चा काढण्यात आला. तसेच शहरातील उद्योग धंदे बंद ठेवून नागरिकांनी पाठिंबा दिला.
प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याठिकाणी माजी मंत्री प्रकाश आवाडे, समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, माजी खासदार निवेदिता माने, सतीश कोष्टी, विनय महाजन, दीपक राशिनकर, विश्वनाथ मेटे, आदींनी यंत्रमाग उद्योगाच्या व्यथा मांडल्या. शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चासमोर विविध वक्त्यांची भाषणे झाली व मोर्चा विसर्जित करण्यात आला.यंत्रमाग उद्योगाच्या विविध मागण्यांसाठी इचलकरंजीत काढण्यात आलेल्या मोर्चाचे छायाचित्र.