इचलकरंजी : येथील महापुराचे पाणी सोमवारपासून ओसरू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, तो रोखण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने जनजागृती व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, तसेच पूरग्रस्त भागात तातडीने स्वच्छता व औषध फवारणी करण्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोग्य व पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. त्यामुळे वॉर्ड क्र १, २ ,३ व १३ या पूरग्रस्त भागातील स्वच्छता करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यासाठी औषधे, धूर फवारणी व वॉर्डनिहाय कामाचे नियोजन करण्यात आले आहे. ६०० कर्मचारी, १२ स्वच्छता निरीक्षक, २८ वॉर्ड निरीक्षक, ४० नाले सफाई कर्मचारी, औषध फवारणीसाठी ३५ कर्मचारी, पाण्याचे चार टॅँकर, सोळा ट्रॅक्टर-ट्रॉल्या, चार औषध फवारणी ट्रॅक्टर, दोन जेसीबी तसेच कचरा उठावासाठी दररोज ८० ते १०० खेपांचे नियोजन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी गमबूट, ग्लोज, मास्क, रेनकोट, सॅनिटायझर, बुट्या, सर्पमित्रांसाठी स्ट्रिक, आदी साहित्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्यावतीने जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून औषधे, धूर फवारणी, आवश्यक मशीनरी व पाण्याचा टॅँकर पुरविण्यात येणार आहे.
बैठकीस नगराध्यक्ष अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, संजय केंगार, नगरसेवक सागर चाळके, बाबासाहेब कोरे, जलअभियंता सुशाष देशपांडे, बाजीराव कांबळे, आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे, विजय पाटील, शीतल पाटील यांच्यासह आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.