: खबरदारी घेण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततचा पाऊस व धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला विसर्ग यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली.
संततधार पावसामुळे पंचगंगा इशारा पातळी ओलांडली आहे. परिस्थिती पाहता आपत्कालीन यंत्रणा सज्ज करत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास पाणी पातळी ६९ फुटांपर्यंत पोहचली आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. धोका पातळी ७१ फुटांवर आहे. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, नगरसेवक राहुल खंजिरे, उपमुख्याधिकारी केतन गुजर, विजय राजापुरे, आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे, अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यू फोर्सचे जवान उपस्थित होते.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज
यंत्रणेत एक यांत्रिक बोट, एक फायबर बोट, २५ लाईफ जॅकेट्स, ६ लाईफ रिंग्ज, ५०० फूट दोर, ३ मेगा फोन, ३ गळ, २ ट्यूब/इनर सेट, २ इमर्जन्सी लॅम्प, २ स्लायडिंग शिडी, ८ रिफ्लेक्टर जॅकेट्स उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकूण १२२ ठिकाणी छावण्या निश्चित केल्या असून, सर्वच ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण साधने, आरोग्य सेवा, उपलब्ध आहे.
सेंट्रल किचनची व्यवस्था
आज, शनिवारपासून पालिकेमार्फत सेंट्रल किचनची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्थलांतरित नागरिकांना अन्न पुरविण्यासाठी सामाजिक संस्थेने मदत करावी, असे आवाहन उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी केले आहे.