राजाराम पाटील-- इचलकरंजी आगामी महिला दिनानिमित्ताने शहरात ‘पोस्टर’ युद्ध चालू झाले असून भाजप महिला आघाडी व इचलकरंजी नगरपालिका यांच्यात चढाओढ निर्माण झाली आहे. शिवाजी पुतळा चौकातील मोक्याच्या ठिकाणी ‘पोस्टर’ लावण्यावरून खुद्द नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी नगरपालिकेच्या फलकालाच जागा दिली पाहिजे म्हणून संबंधित मक्तेदाराला खडे बोल सुनावले.भाजप महिला आघाडीच्यावतीने ६ व ७ मार्चला महिला महोत्सवाचे आयोजन केले असून होम मिनिस्टर आणि स्पॉट गेम शो, तसेच या रावजी... बसा भाऊजी हा खास महिलांसाठी लावणी शो आयोजित केला आहे. या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आदींच्या छब्या वापरल्या आहेत, तर नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा महिला महोत्सव ८, ९, १० व ११ मार्चला होत आहे. त्यामध्ये उद्घाटन, नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम, ‘लोकधून’ हा लोककला दर्शविणारा मराठमोळा कार्यक्रम, लावणी संग्राम हा लावणींचा कार्यक्रम, तसेच स्मार्ट सासू-सून, स्पॉट गेम अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या फलकावर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, सभापती प्रमिला जावळे, उपसभापती मंगल मुसळे, आदींचे फोटो झळकले आहेतशिवाजी पुतळा चौकातील एस. टी. स्टँडच्या आवारात पण कोपऱ्यावरील मोक्याच्या ठिकाणी इचलकरंजी नगरपालिकेचा महिला महोत्सवाचा फलक लावला होता, पण नगरपालिकेच्या महिला महोत्सवापूर्वी सहा तारखेला भाजप महिला आघाडीचा महिला महोत्सव असल्यामुळे नगरपालिकेचा फलक काढून त्याठिकाणी भाजप महिला आघाडीचा फलक लावण्यात आला. याबाबतची माहिती नगराध्यक्षा बिरंजे यांना समजताच त्या कमालीच्या संतापल्या. त्यांनी ताबडतोब पालिकेतील बाजार कर खात्यामार्फत संबंधित मक्तेदाराला पालिकेत बोलावले. ‘त्या’ फलकाच्या ठिकाणी आमचा नगरपालिकेचा फलक लागला पाहिजे. त्यासाठी त्याला एक तासाची मुदत देण्यात आली. या मुदतीत पालिकेचा फलक लागला नाही, तर तुमचे शहरातील सर्व फलकांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही नगराध्यक्षांनी दिला.मात्र, भाजप महिला आघाडीचा फलक काढायचा म्हणजे खुद्द आमदारांना दुखावल्यासारखे होईल. म्हणून नगरपालिका आणि संबंधित मक्तेदारांनी युक्ती केली आणि भाजप महिला आघाडीच्या जवळ अन्य चार फलकांवर नगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या महिला महोत्सवाचे फलक झळकावले. यामुळे आमदार पण खुश आणि नगराध्यक्षांची मर्जी पण राखली गेली, असे ‘एका दगडात दोन पक्षी...’ राखण्याची ‘नामी आयडिया’ लढविली. निवडणुका आणि डिजिटल फलकसाधारणत: आगामी नऊ महिन्यांमध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि महिला महोत्सवाचेही शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे भाजप आणि नगरपालिका या दोघांनीही महिला महोत्सव जोरदार करण्याचे आयोजन केले. त्यामुळे शहरात सर्वत्र डिजिटल फलक झळकविण्यात आले आहेत.
इचलकरंजीत ‘पोस्टर युद्ध’
By admin | Published: March 04, 2016 11:26 PM